चौगले परिवाराच्या वतीने फळझाडे संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश
कुडूत्री, ता. राधानगरी (प्रतिनिधी) – पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दिवंगत व्यक्तीच्या स्मृती चिरंतन जपण्याचा स्तुत्य उपक्रम कुडूत्री येथे राबविण्यात आला. कै. सौ. पार्वती पांडुरंग चौगले यांच्या उत्तरकार्य निमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांना कलमी आंब्याच्या वृक्षरोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणासह फळझाडे संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
दिवंगत पार्वती चौगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “एक वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत वाटप करण्यात आलेली कलमी आंब्याची रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले. पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी दिवंगतांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रेमळ, सामाजिक व कुटुंबवत्सल स्वभावाच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
या उपक्रमाचे आयोजन त्यांचे पुत्र श्री. बाबुराव पांडुरंग चौगले, श्री. धनाजी पांडुरंग चौगले (सदस्य, राधानगरी तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती) तसेच संपूर्ण चौगले परिवाराच्या वतीने करण्यात आले. यामध्ये कुटुंबातील नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.


































































