संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सतर्क ठेवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्हा प्रशासनाला २४ तास अलर्ट मोडवर राहण्याच्या दिल्या सूचना…

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – कोल्हापूर जिल्ह्यावर संभाव्य अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, जलसंपदा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढील काही दिवस २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच पुढच्या काही दिवसांत हवामान विभागाने राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा तसेच ताशी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. परिणामी नद्या, ओढे, धरणे आणि पूरप्रवण भागातील परिस्थिती वेगाने बदलू शकते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही ढिलाई न करता बचाव आणि मदतकार्याची सर्व तयारी पूर्ण ठेवावी, असेही पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

घराबाहेर पडणे शक्यतो टाळा

आपला जीव महत्त्वाचा असून अनावश्यक धोका टाळा असे आवाहन करत त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना पुढचे काही दिवस अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले. नदी, ओढे, पूरग्रस्त पूल, धबधबे किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचा मोह टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता प्रथम मानावी, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला सर्व नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याच्या, बचाव पथके, नौका, जीवनरक्षक साहित्य, औषधसाठा, अन्नधान्य आणि आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. पूरप्रवण गावांवर विशेष लक्ष ठेवून आवश्यक वाटल्यास तातडीने स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी. कोणत्याही नागरिकाला मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी बजावले.

वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, रस्ते आणि दळणवळण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. झाडे पडणे, रस्ते बंद होणे, भूस्खलन किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रशासन सज्ज आहे, पण नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक सूचनेचे पालन करा असे सांगत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संपूर्ण जिल्ह्याला सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते बंद होणे किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित विभागांनी तातडीने मदतकार्य सुरू करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून प्रत्येक घटनेवर त्वरित प्रतिसाद देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.