कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिठ्ठा उड्डाणपूल, आजरा टोलनाका स्थानांतर व गारगोटी – कोल्हापूर रस्ता दुरूस्ती बाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याच्या वाहतूक सुविधांच्या उन्नतीसाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
यावेळी नामदार प्रकाश आबिटकर यांनी राज्य महामार्गावरील मुदाळतिठ्ठा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी केंद्रीय राखीव निधी (CRF) अंतर्गत मंजुरी, संकेश्वर- आजरा राष्ट्रीय महामार्गावरील विद्यमान टोल नाका स्थलांतरित करणे व गारगोटी – कोल्हापूर रस्ता दुरूस्तीसाठी निधिची मागणी नामदार गडकरी यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील रस्ते विकास व वाहतूक सुविधा उन्नतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सदगुरु संत बाळूमामा यांच्या पवित्र स्थळी दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून येतात. त्यामुळे कोल्हापूर- गारगोटी मार्गावरील मुदाळतिठ्ठा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर राज्य महामार्ग क्रमांक १८९ वर मुदाळतिठ्ठा येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी पालकमंत्री आबिटकर यांनी केली. उड्डाणपूलामुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक यांना मोठा दिलासा मिळेल,
संकेश्वर-आजरा-आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील विद्यमान टोल नाका आजरा शहराजवळ असल्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. शहराचा विस्तार आणि वाढती वस्ती लक्षात घेता हा टोल नाका घाटकरवाडी-आंबोली मार्गादरम्यान स्थलांतरित करण्याची अनेक नागरिकांची मागणी असुन, टोल नाका स्थलांतरित केल्यास स्थानिक प्रवाशांची गैरसोय कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढेल, असेही प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांना सांगितले.
तसेच गारगोटी- कोल्हापूर या रस्त्याच्या दुरुस्ती साठी निधि उपलब्ध करून देण्याची मागणी केली . या तीनही विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन, या भेटीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.























































