गेल्या 14 वर्षांपासून प्रज्ञा फाऊंडेशन आणि नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार
रत्नागिरी – प्रज्ञा फाऊंडेशन, चिपळून संचलित नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी, रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी पोलीस भरती 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. संस्थेच्या तब्बल 17 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले असून, या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
गेल्या 14 वर्षांपासून प्रज्ञा फाऊंडेशन आणि नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार व परिणामकारक मार्गदर्शन देत आहे. या कालावधीत साडेसहाशे हून अधिक विद्यार्थी विविध शासकीय पदांवर नियुक्त झाले आहेत. यावर्षीच्या पोलीस भरतीतील यशामुळे संस्थेच्या यशपरंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या कार्यक्रमास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री विवेक पाटील तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. कोमल मिलिंद कदम यांची मान्यवर उपस्थिती लाभली. यावेळी प्रज्ञा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रज्ञा प्रभाकर मोरे, नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीचे प्रभाकर मोरे, मार्गदर्शक मा. रितेश चव्हाण सर तसेच बँकिंग स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शिका अपूर्वा मोरे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आदित्य उदय धुमासकर, सुरज सुभाष नारकर, सम्राट रावसाहेब गडदे, अथर्व भगवान पाटील, अंकित अनंत म्हादलेकर, प्रतीक विश्वनाथ पड्यार, कांचन संतोष मोरे, ऋषिकेश सूर्यकांत साळवी, तुळशीदास रविंद्र पवार, अंकित अनंत सोलकर, अनुप सुतार, विश्वजीत माने, रविंद्र दत्ताराम माचिवले, श्रुती संजय दुर्गावळी, अक्षया मधुकर जाधव, पंकज कांबळे यांचा समावेश असून, सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागील खडतर प्रवास, मेहनत आणि संघर्ष यांची मांडणी केली. अनेक अडचणींवर मात करत सातत्याने अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.
तसेच अजय लोहार, सायली शिंदे व माऊली चोरगे हे विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी मा. विवेक पाटील यांनी मार्गदर्शन करताना पोलीस सेवेकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता समाजसेवेची भावना ठेवून जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. पोलीस वर्दीतील कर्तव्यभावना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रज्ञा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रज्ञा मोरे यांनी आपल्या भाषणात कोकणातील प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहात आणणे ही एक चळवळ असल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या गावागावात इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेमार्फत सरळ सेवा, पोलीस भरती तसेच बँकिंग स्पर्धा परीक्षांच्या नवीन बॅचेस सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रज्ञा प्रीमियम लायब्ररी व अभ्यासिकेच्या सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रज्ञा फाऊंडेशन व नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीच्या वतीने करण्यात आले असून, पुढील काळातही अशीच यशस्वी परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
























































