गावातील कचरा गोळा करून त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर
नागाव (रुपेश आठवले) – नागांव (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. विमल शिंदे आणि उपसरपंच श्री. सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, दिनांक 1 मे रोजी हा कार्यक्रम पार पडला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील कचरा गोळा करून त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येईल, कचरा साठणार नाही आणि परिसर स्वच्छ व सुंदर राहील, असा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे.
या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, हातकणंगले तालुक्याच्या बी.आर.सी. सौ. माधुरी जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































