बृन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांच्या कल्पक संकल्पनेतून साकारलेला हा आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रम…
मुंबई – आपण सर्वच जाणतो की कोणत्याही विषयाचे आकलन होण्यासाठी वाचन ही पहिली पायरी आहे. आजमीतीस लहान मुलं, तरुण पिढी आणि काही अंशी वार्धक्याकडे सरकत चाललेल्या माणसांमध्येही वाचनाची आवड किंवा ओढ कमी होत चाललेली दिसून येते. अशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे एकूणच मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातच निर्माण झाला आहे. मराठी भाषेचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत रविवार 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता श्रमिक जिमखाना लोअर परळ येथे मराठी वर्तमानपत्रांचा वाचन सोहळा असा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवार असूनही मराठी भाषेच्या आणि मराठी वर्तमान पत्राच्या प्रेमाखातर पालकांनी आणि मुलांनी कार्यक्रमास गर्दी केली होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत आपल्या आवडीच्या वर्तमानपत्राचे वाचन केले.
प्रसिद्ध समुपदेशक आरती बनसोडे यांनी मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. वर्तमानपत्र वाचल्याने आपली भाषा तर समृद्ध होतेच त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अचूक माहितीही आपणास मिळते. म्हणूनच प्रत्येक मराठी भाषिक पालकाने स्वतःसाठी तसेच आपल्या मुलांसाठी किमान एक मराठी वर्तमानपत्र रोज घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.आपल्या पाल्याला मोबाईल पासून काही वेळ दूर ठेवून वर्तमानपत्र वाचन करण्यास प्रवृत्त करणे ही आजच्या काळाची गरज आहे. असे झाले तरच आपली आजची पिढी आपली मराठी मातृभाषा पुढच्या पिढीला संक्रमित करू शकेल. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून रोज निर्माण होणाऱ्या माहिती रुपी गंगेतील दोन ओंजळी जरी आपण आपल्या मुलांच्या ओंजळीत देऊ शकलो तरी मराठी भाषेचं ऋण फेडण्याच समाधान तुम्हाला प्राप्त होईल. सर्व मुलांनी रोज एका वहीत वर्तमानपत्राच्या फक्त पाच ओळी नियमित लिहून ती वही पुढच्या वर्षी मराठी राजभाषा दिनी ह्याच मंचावर आणून दिल्यास आकर्षक बक्षिसे मुलांना देण्यात येतील असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित सर्व मुलांना पदक, प्रमाणपत्र आणि पौष्टिक आहार देण्यात आला. याकामी डेसिमल फांडेशन मुंबई व समाजसेवक डॉ. निलेश मानकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव कृष्णा पाटील यांनी केले तसेच त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही निवडक मुलांनी वर्तमान पत्राचे महत्व मंचावर येऊन कथन केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्तमानपत्रांनी विविध सामाजिक विषय घेत उभारलेली सामाजिक चळवळ तसेच आजमितीस ही वर्तमानपत्रांनी जपलेली विश्वासार्हता व सामाजिक बांधिलकी यावर कार्यक्रमाच्या दर्शनी भागात लावलेला माहिती फलक व वृत्तपत्र वाचन एक अविस्मरणीय अनुभव व वर्तमानपत्र वाचनाचा वारसा जतन करण्याचा विद्यार्थी पालक यांनी सेल्फी पॉइंट द्वारे केलेला प्रयत्न सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
या सामाजिक उपक्रमास प्रसिद्ध समुपदेशक आरती बनसोडे, विधानपरिषद आमदार सुनील शिंदे, अध्यक्ष रविंद्र देसाई, दीपक शिंदे, विशाल श्रीवास्तव, दिलीप डेरे, दिनकर कोकितकर, डॉ.निलेश मानकर, संजय चौकेकर, भालचंद्र पाटे, घनशाम गावकर, विठोबा भोसले, पांडुरंग पाटील, डॉ. प्रकाश पाटील, विलास पाटील, नितीन कोलगे, राजेंद्र चव्हाण, शंकर रींगे, गणेश खेनट, अमर सावंत, प्रा.हेमंत सामंत,विजय पवार, प्रवीण चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. बृन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले याच्या कल्पक संकल्पनेतून साकारलेल्या या आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांचे हस्ते विठ्ठल रखुमाई ची सुंदर मूर्ती देवून त्यांना गौरविण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थी पालक मान्यवरांचे आभार अध्यक्ष रविंद्र देसाई यांनी मानले.