एका झंझावाताचे अचानक निघून जाणे… मनाला चटका लावून जाणारा…
शिरपुर (गोपाल के.मारवाड़ी) – येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, माजी जिल्हा सचिव ॲड.मदन पुनमचंद परदेशी (वय ७० यांचे धुळे न्यायालयातच कर्तव्य बजावत असताना आज दि13 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने न्यायालयांतच प्राणज्योत विझली.ॲड.मदन परदेशी हे भाकपा चे एकनिष्ठ व धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी जिल्हाभरात एकनिष्ठतेने सामाजिक चळवळींचे नेतृत्व करून तसेच न्यायालयीन लढा लढून सर्वहारा वर्गाला न्याय मिळवून दिला. तसेच ग्रा.पं.कर्मचा-यांना पगारवाढ, राहणीमान भत्ता इ. मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
न्यायालयीन लढ्यात आपल्या पक्षाची कायदेशीर बाजू मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. न्यायालयीन क्षेत्रात त्यांच्या नांवाचा आदरयुक्त दबदबा होता. तसेच सर्वहारा वर्ग, शोषित, पीडित वर्गासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.शोषित, पीडितांचे न्यायालयीन कामकाज करित असतांना हा ‘लालतारा’ सर्व कम्युनिस्ट परिवाराला आणि मित्र परिवाराला पोरका करून अकस्मात निखळला. आणि त्यांच्या कुटुंब, मित्र परिवारासह संपूर्ण चळवळीच्या साथींना पोरके करून गेले. त्यांचे लहान बंधु ॲड. हिरालालजी परदेशी सुपुत्र ॲड.रोशनजी परदेशी हे चळवळीत कार्यरत असतांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अकस्मातपणे सर्वांना सोडून ते आपल्यातून निघून गेले. विश्वास बसत नाही. ज्यांचे काही वेळापूर्वी मार्गदर्शन घेतले,सोबत दिलखुलास गप्पा मारल्या, चर्चा केली. त्यांची ही शेवटची भेट ठरेल असे कधीही वाटले नाही. अश्या या जिगरबाज कायदेतज्ज्ञ, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या झंझावाती वादळाची अंत्ययात्रा उद्या 14/2/2024 बुधवारी सकाळी 10:00 वाजता राहते घर, खालचे गांव बालाजी मंदिराजवळ, खरेवाडा, शिरपुर, जि. धुळे येथून निघणार आहे.
त्यांच्या दुःखात काम्रेड हिरालाल परदेशीं सह मोहन पाटील, ॲड. गोपालसिंह राजपूत, ओंकार आबा जाधव, राजेशभाऊ मारवाडी, डॉ सरोजताई पाटील, शिवाजीराव हनुमंतराव बोरसे, योगेंद्र देवीसिंह पाटील (राजपूत) भरत बाजीराव रोकडे, कॉ.वसंतराव पाटील, कॉ. साहेबराव पाटील, कॉ. अशोकराव बाविस्कर, कॉ पोपटराव चौधरी, कॉ. अर्जुनदादा कोळी, कॉ.हिरालालजी सापे, हिरालाल कोळी सह हजारों साथी सामिल आहेत.