शिरपूर पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचे स्वागत बदली झालेले पोलीस निरीक्षक व महानगरपालिका प्रमुख व डीबी पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित…
शिरपुर (गोपाल के. मारवाडी) – शिरपुर शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांचे स्वागत, पोलिस निरीक्षक अन्सारामजी आगरकर व शिरपुर नगरपालिकेचे सीओ तुषार नेरकर यांची बदली झाल्याबद्दल तसेच डीबी पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी लादूराम दादा चौधरी यांची सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला. अश्या आगळ्यावेगळ्या सर्वसमावेशक सोहळ्याचे आयोजन शिरपुर पोलिस ठाण्यात मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. चारही लोकप्रिय शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या भावस्पर्शी सत्कार समारंभात शिरपुर तालुका पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी , प्रसिद्ध दैनिक व साप्ताहिकांचे पत्रकार आणि युट्युब चॅनेल प्रतिनिधींसह यावेळी पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे होते. याप्रसंगी नवनियुक्त पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या आगमनाप्रित्यर्थ, तसेच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अन्साराम आगरकर यांची शिरपूर येथील डीवायएसपी कार्यालयात बदली झाल्याने आणि शिवनपा चे सीओ तुषार नेरकर यांची अमळनेर येथे बदली झाल्याने त्यांचा सत्कार डीवायएसपी सचिन हिरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन करण्यात आला. आणि डीबी पथकातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी लादूराम चौधरी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार सर्वश्री डीवायएसपी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्यासह के. के. पाटील, सीओ तुषार नेरकर आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. छायाताई पाटील यांनी केला. उपस्थित सर्व पत्रकार व मान्यवरांनीही चारही सत्कारमूर्तींना पुष्पहार, शाल व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला. यावेळी पोलिस पाटील संघटनेतर्फे उंटावद गावांचे पोलिस पाटील, भारतीय पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व आयुष्मान भारत योजनेचे जिल्हाध्यक्ष राजेश मारवाडी, जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन, ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह राजपूत, माजी नगरसेवक राजुभाई शेख, रज्जाक कुरेशी, इरफान मिर्झा व ॲड. अमित जैन यांनी मनोगत व्यक्त केले.
पत्रकार राजेश मारवाडी यांनी आपल्या भाषणात नवीन आलेल्या, बदली झालेल्या व निवृत्त होणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली. “पोलिस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे पोलीस विभागाकडून आम्हाला वेळोवेळी असेच सहकार्य मिळत राहील. शिरपूर शहर हे शांतताप्रिय शहर आहे, त्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास झाला आहे.” असेही त्यांनी सांगितले. तसेच विविध वक्त्यांनी शिरपुर शहर तसेच परिसरात माणुसकीची भावना व शहरातील सर्व समुदायाच्या बंधुभावाचे कौतुक केले. इतर वक्त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस व प्रशासन बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल विशेष आभार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती पोनि अन्सारामजी आगरकर यांनी आपल्या दिलखुलास शैलीत सांगितले की,” शिरपूर शहरात काम करण्याचा एक वेगळाच अनुभव मला मिळाला. हे शहर समंजस आणि मानवतावादी भावनेने परिपूर्ण आहे. सर्वांगीण विकास कामातही येथील नेतृत्व सर्वोत्कृष्ट आहे. शिरपूर- वरवाडे महानगरपालिकेचे सीओ तुषार नेरकर यांनीही आपले अनुभव कथन करून या शहराच्या चांगल्या आठवणी घेऊन जात असल्याचे सांगितले.
शिरपूर शहरातील जनता व नेते अमरिश पटेल यांचे सहकार्य व सर्व पत्रकार तसेच नागरिकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. येथील प्रशासकीय अधिकाऱ्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सुध्दा शहरातील सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. सर्व चारही सत्कारमूर्तींनी त्यांचे स्वागत केले म्हणून आयोजकांचे विशेष आभार व्यक्त केले. ३१ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले डीबी पथकातील लोकप्रिय पोलिस अधिकारी लाडूराम चौधरी यांनी सांगितले की,” वयाच्या १२व्या वर्षी वडिलांच्या निधनामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही आणि पोलिसात नोकरीला लागल्याचे भावनिकपणे सांगितले. पोलिस विभागातही मात्र आजपर्यंत जिथे जिथे माझी ड्युटीवर नियुक्ती झाली आहे तिथे मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे.या वर्दीशी मी समरस होऊन काम केले. त्यामुळे माझ्या ड्यूटीच्या शेवटच्या काळात जे सहकार्य व मार्गदर्शन डीवायएसपी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक आगरकर साहेब यांच्यासह सर्व सहकारी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले, त्याबद्दल तसेच या शहरासह तालुक्यांतील नागरिकांचा ही सदैव ऋणी राहीन. नवनियुक्त पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आपल्या कार्यपद्धतीतून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेन. माझी कारकीर्द शिरपुरकरांना प्रदीर्घ काळ स्मरणात राहील असे कार्य करायचे आहे. “शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “आपण नुकतेच सर्व चारही कर्तव्यदक्ष सत्कारमूर्तींचे अभिनंदन व स्वागत केले.
मलाही यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे याचा मला मनापासून आनंद आहे. आपण जिथे जाल तिथे तुमची कामगिरी चांगली होवो आणि तुमचे नावही उंचावेल आणि तुम्हा सर्वांना निरोगी,दीर्घायुष्य लाभावे. सर्वांच्या भावी जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होवो. पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन यशवंत निकवाडे सर यांनी केले. आभार प्रदर्शन उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत गायनाने समारंभाची सांगता झाली. कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रमस्थळी सर्व पाहुणे व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.