भारतीय संघ T20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यासाठी सिडनीत आहे. टीम इंडियाला गुरुवारी (२७ ऑक्टोबर) नेदरलँडविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांमध्ये प्रथमच टी-२० सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. भारतीय खेळाडूंनी सिडनीतील जेवणाबाबत तक्रार केली आहे. संघाने थंड सँडविच आणि काकडी-टोमॅटो खाण्यास नकार दिला.
याशिवाय खेळाडूंना 42 किमी दूर असलेल्या ब्लॅकटाऊनमध्ये सराव करण्यास सांगण्यात आले. व्यवस्थापनाने तिथपर्यंत जाण्यास नकार दिला. पर्थ, ब्रिस्बेन आणि मेलबर्ननंतर भारतीय संघ सिडनीला पोहोचला आहे. पर्थ, ब्रिस्बेन आणि मेलबर्नमध्ये संघाने काहीही तक्रार केली नाही. सिडनीमध्ये भारतीय संघाबाबत काही चुकीचे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
2007-08 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हा सिडनीमध्ये कसोटी सामना खेळला गेला होता. हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भिडले. त्यानंतर भारताच्या फिरकीपटूवर सायमंड्सला माकड म्हटल्याचे आरोप झाले. मात्र, हरभजनने हे आरोप फेटाळून लावले होते. असे असतानाही त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाविरोधात कर्णधार अनिल कुंबळे, अनुभवी सचिन तेंडुलकरसह सर्वच खेळाडूंनी बंड केले होते. भारतीय संघाने दौरा सोडण्याचा निर्णय घेतला होता. आयसीसीला बीसीसीआयपुढे नमते घेत आपला निर्णय मागे घ्यावा लागला.