२०२२ सरण्याच्या मार्गावर असताना आणि २०२३चे स्वागत करण्यास सर्वचजण उत्सुक असतानाच चिपळूणकर नागरिकांनी अत्यानंदाने अक्षरशः उड्या माराव्यात अशी बातमी कळली आहे. ही बातमी केवळ आनंदाचीच आहे असे नव्हे तर अभिमान वाटावा अशीही आहे. या बातमीमुळे चिपळूण नगरपालिकेचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. ही बातमी आहे चिपळूण पालिका भ्रष्टाचारमुक्त झाल्याची! आता चिपळूण एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखले जाईल यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
खरं तर ही बातमी इतके दिवस लपवून का ठेवली याचेच आश्चर्य वाटते. परंतु थोर शहरसुधारक इनायत मुकादम हे पालिकेच्या कारभारविरोधात, प्रशासनाविरोधात खोडसाळ तक्रारी करतात त्याबाबत कारवाई करावी अशी मागणी चिपळूण पालिकेचे मुख्य अभियंता आणि शहराचे भाग्यविधाते परेश पवार यांच्यासह पालिका कर्मचारी नेत्यांनी केली. त्याबाबत डीवायएसपी सचिन बारी यांना निवेदन देतानाचा फोटो आणि बातमी पेपरात झळकली आणि त्यामुळेच या भ्रष्टाचारमुक्तीच्या मोहिमेची चर्चा सुरू झाली. अन्यथा पत्रकारांना, नागरिकांना कळू न देता, प्रसिद्धीपासून लांब राहून ही मोहीम यशस्वी करण्याची कल्पना होती. पण असो भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकून कंटाळा आला होता असे असताना ही बातमी सर्वांना सुखावून टाकणारी आहे त्यामुळे त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसलाच पाहिजे.
मुख्याधिकारी, त्यांचे साहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्रामुख्याने अभियंता परेश पवार यांनी गेल्या काही महिन्यांत चिपळूण पालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी जीवाचे रान केले, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. पालिकेत रस्ते सोडा, गटारे सोडा आणि अशी मोठमोठी कित्येक कंत्राटे असुदेत पण साध्या टाचणीच्या खरेदीतही भ्रष्टाचार होणार नाही यासाठी त्यांनी डोळ्यांत तेल घालून काम केले आहे. सर्व ठेकेदार हे आपण चिपळूण नगरीचे विनम्र सेवक आहोत या भावनेने मुख्याधिकारी आणि अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. आता रस्ते केल्यापासून चार दिवसांत उखडणार नाहीत किमान एक पावसाळा काढतील. गटारे मापात आणि योग्य रुंदी, उंची आणि मुळात योग्य दिशेला चढउतार ठेऊन बांधली जातील. तीही एखादा पावसाळा सहज काढतील. सार्वजनिक शौचालयांना भ्रष्टाचाराची दुर्गंधी येणार नाही. ती एरपोर्टवर असतात त्या बजेटमध्ये चकाचक बांधली जातील. पालिकेच्या आरोग्य, बांधकाम, पाणी, महिला बालकल्याण, मागासवर्गीय अशा अनेक विभागामार्फत असंख्य योजना राबवून नागरिकांची सेवा केली जाते. त्यात आता एक पै चाही घोटाळा होणार नाही. लेबर काँट्रॅक्टर आपापल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेळेत पगार देतील, पीएफ भरतील, त्यांना योग्य त्या सोयीसुविधा देतील. आता गरीब कामगारांचे दुष्टचक्र संपले आहे. आता पालिकेच्या इमारतीतच नव्हे तर बाजूच्या रस्त्यावर जरी टक्केवारी असा शब्द कोणी उच्चारला तरी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे हृदयाचे ठोके वाढतात.
चिपळूण शहरात उभी राहिलेली आणि उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामे आता मुख्याधिकारी आणि अभियंता यांच्या रडारवर आहेत. ती रोखली जातील. बंगले असोत, अपार्टमेंट असोत वा दुकाने असोत आता प्रशासनाची घारीची नजर असणार आहे आणि अधिकारी हातोडा घेऊन सज्ज आहेत. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अभियंता परेश पवार, त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांनी भ्रष्टाचारमुक्त पालिकेसाठी जी अपार मेहनत घेतली आहे त्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतील. खरं तर त्यांना या कामात, मोहिमेत नगरसेवकांची मोठी साथ मिळाली असती, पण दुर्दैवाने त्यांची मुदत संपली आणि गेले वर्षभर एकट्या प्रशासनाला या भ्रष्टाचारमुक्त मोहिमेचा भार सोसावा लागला. नगरसेवक जोडीला असते तर ही मोहीम सहा महिने आधीच फत्ते झाली असती. प्रशासन आणि नगरसेवक ही पालिकेच्या रथाची दोन चाके. परंतु सध्या बिचाऱ्या प्रशासनाला हा रथ ओढावा लागत आहे. (आता त्यांना नगरसेवक नाहीत ते बरेच वाटते का ते मात्र माहीत नाही. नगरसेवकांना मात्र आपण प्रशासनाला साथ द्यायला नाही याचे वाईट वाटत आहे.)
एक मात्र खरे आहे प्रशासनाने खूप मोठे कार्य केले आहे. आज सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला असताना ‘शून्य भ्रष्टाचार’ ही मोहीम यशस्वी करणे सोपे नाही. पूर्वी एकाच्या, दोनाच्या पुढे किती शून्य दिली तर योग्य टक्केवारी होते याचा हिशोब व्हायचा आता सगळंच ‘ शून्य ‘! अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या पगारापेक्षा दहा, वीस पट प्रॉपर्टी केली होती तेही आता पगारात परवडेल अशाच घरातून, फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यात राहणार आहेत. एकेक कोटीचे फ्लॅट, बंगले, पंचवीस तीस लाखांच्या गाड्या याबद्दल त्यांना पश्चाताप होतोय. त्यामुळे इनायत मुकादम यांनी वाल्याचा वाल्मिकी होऊ इच्छिणाऱ्या, तसा निर्धार केलेल्या अधिकाऱ्यांना , कर्मचार्यांना तक्रार करून त्रास देऊ नये. त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक कारभारावर डाग लावू नये. आणि यापूर्वी ज्या तक्रारी केल्या आहेत त्यात दम असेल तर त्याचा पाठपुरावा करून दोनचार अधिकारी , कर्मचारी यांना घरी बसवून मुख्याधिकारी, परेश पवार यांच्या मोहिमेला बळ द्यावे. त्यांना प्रोत्साहन मिळेल असे पहावे.
ता. क. – मुख्याधिकारी, परेश पवार यांना भ्रष्टाचार मुक्त पालिकेच्या मोहिमेत ज्या ज्या अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांनी सहकार्य केले त्यांचे अभिनंदन तर आहेच, परंतु गेली अनेक वर्षे ज्यांनी ज्यांनी स्वतःला भ्रष्टाचारमुक्त ठेवले, आपले काम प्रामाणिकपणे केले त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजेत.
मकरंद भागवत,ज्येष्ठ पत्रकार.
९८५०८६३२६२
चिपळूण.