जिल्हास्तरावरील अधिकारात येत असलेल निर्णय तातडीने घेणार असल्याची ग्वाही… आंबेडकरी समाज पक्ष संघटनेसोबतच्या बैठकीत निर्णय…
कोल्हापूर – भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून दि. 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर येथे आंबेडकरी संघटनाही त्यात सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी या अंदोलनास हिंसक वळण लागून नुकसान झाले. यात सहभागी 1750 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत राज्यस्तरावर मुख्यमंत्री स्तरावर आवश्यक पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी कोल्हापूर शहर अजित टिके, उप विभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर आर टी सोळंखे, आंबेडकरी संघटनेचे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सुभाष देसाई यांचेसह इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, संघटनेची भुमिका लक्षात घेवून तसेच या विषयातील शासनाच्या नियमावलीतील मर्यादांचा विचार करून शक्य तेवढे गुन्हे जिल्हास्तरावर मागे घेण्यासाठी प्रयत्न करू. तसेच पुढिल बाबींसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करू. आपल्याला सर्व लोकांना मदत करायची असून यावर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू. यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करून चांगला तोडगा काढू असे आश्वासनही त्यांनी संघटनेला दिले. उपस्थित आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री स्तरावर हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उपस्थितांना दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत पुढिल बैठकीत चर्चा करून सर्व सदस्यांचे अभिप्राय नोंदवून याबाबतचा सकारात्क अहवाल शासनाकडे देवू असे सांगितले.
पुणे येथील भीमा कोरेगांव येथील शौर्यस्तंभास 3 जाने 2018 रोजी 200 वर्षे झाल्याच्या निमित्याने जगभरातील लाखो भीम सैनिक अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा या ठिकाणी आले होते. यावेळी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या निषेधार्त 3 जाने 2018 रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या महाराष्ट्र बंदला कोल्हापूर जिल्हयातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने १७५० जणांवर गुन्हे दाखल केले गेले. कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन, शाहूपुरी, लक्ष्मीपूरी, राजारामपूरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले. जिल्हयास्तरीय समितीकडे भीमा कोरेगाव आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्याची शिफारस आंबेडकरी संघटनांनी निवेदनाद्वारे दिली आहे.