: Editorial विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल; मोकळा श्वास मिळणार कुठून?

राज्यात एकीकडे दुष्काळ, ‘अल-निनो’चा प्रभाव, पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानामुळे जीवसृष्टी होरपळत असताना, दुसरीकडे सरकार मात्र विकासाच्या नावाखाली निसर्गाचीच कत्तल करताना दिसत आहे. मोठे प्रकल्प, शहरीकरण आणि सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. या अविचारी धोरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून संपूर्ण जीवसृष्टी धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.
सरकार एकीकडे वृक्षलागवडीच्या घोषणा करते, तर दुसरीकडे जुनी वने आणि शेतजमिनी उद्ध्वस्त करत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत (२५३ हेक्टर / सुमारे ६०० एकर) येथे खासगी ऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडण्याचा घाट घातला गेला; जनतेच्या तीव्र विरोधामुळे त्यावर तात्पुरती स्थगिती आली. त्यानंतर आता अमरावतीतील मेळघाटच्या (२४० हेक्टर / ५९३ एकर) अधिवासावर कुऱ्हाड चालवत सुमारे १ लाख ४९ हजार ४३६ झाडे तोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्पातही (१५०.७४ हेक्टर / ३७२.५ एकर) जलविद्युत प्रकल्पासाठी निसर्गाचा बळी देण्याची तयारी सुरू आहे, ज्याला पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध दर्शवला आहे.
एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे सरकार त्यांच्या हताशपणाचा फायदा घेत कोट्यवधी रुपये देऊन त्यांची सुपीक जमीन खरेदी करत आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात (गोधनी आणि लाडगाव रिठी) ‘नवीन नागपूर’ व ‘आयबीएफसी’ प्रकल्पासाठी तब्बल ६९२.०६ हेक्टर (सुमारे १,७१० एकर) शेतजमीन संपादित केली जात आहे. “ही वनजमीन नाही तर शेतजमीन आहे,” असा युक्तिवाद प्रशासन करत असले, तरी या १,७१० एकर परिसरातील हजारो जुने वृक्ष, त्यावरील पशुपक्ष्यांचे अधिवास आणि राज्याचे लाखो टन अन्नधान्य उत्पादन कायमचे नष्ट होणार नाही का?
कर्जत, मेळघाट, तारळी आणि नवीन नागपूर या चारच प्रकल्पांचा विचार केल्यास, राज्यातील एकूण १,३३५.८ हेक्टर (सुमारे ३,२७५.५ एकर) हिरवागार गालिचा आणि सुपीक जमीन कायमची भुईसपाट होणार आहे. ५० वर्षे जुनी झाडे तोडली तर त्यातून मिळणारा प्राणवायू (ऑक्सिजन) कोठून आणणार? केवळ उद्योगपतींच्या हितासाठी सामान्य माणूस, शेतकरी आणि निसर्गाचा बळी देणे हे कोणत्याही सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही.
सरकारने नवीन शहरे आणि प्रकल्पांसाठी निसर्ग ओरबाडण्याऐवजी राज्यातील बंद पडलेले जुने उद्योगधंदे पुन्हा सुरू करण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. जर निसर्गावर होणारा हा घणाघाती प्रहार वेळीच थांबवला नाही, तर भविष्यात श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नधान्य मिळणेही कठीण होईल. आपण सर्वजण अकाली विनाशाच्या दिशेने तर जात नाही ना, याचा सरकारने गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची हीच खरी वेळ आहे.
लेखक :
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार, नागपूर)
संपर्क : ९९२१६९०७७९