चित्रपटासाठी गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करा : नाईक; ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन” कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर  :  चित्रपट निर्मिती म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्नं बघायला शिकवणारी कला आहे. ही कला आत्मसात करायची असेल तर गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक सुनील नाईक यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभाग व पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.  यावेळी नाईक बोलत होते. मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, डॉ. प्रसाद ठाकूर व डॉ. सुमेधा साळुंखे  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. 

दिग्दर्शक नाईक म्हणाले, कलेचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरातूनच मराठी चित्रपटाची निर्मिती व चित्रपट सृष्टीशी निगडित सेन्सॉरसह अनेक बाबींची सुरुवात झाली आहे. चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणारा। एक सक्षम उद्योग आहे. कोणत्याही विषयावरील चित्रपट तयार करण्यासाठी लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, कॅमेरा साऊंड, संकलन या 5 बाबी आवश्यक असतात. ‘आपण करत असलेल्या कृतीतले कौशल्य दाखवणे म्हणजे कला आणि कलेला आकार देणारा व्यक्ती म्हणजे कलाकार. कलेला आकार देणे ही अथक प्रक्रिया असून कलाकाराला स्पष्ट व शुद्ध उच्चार, पाठांतर, आवाजातील चढउतार आदी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. याबरोबरच त्याच्या अंगी आत्मविश्वास आवश्यक असून शब्दांमधला दृष्यभाव समजून घेवून तो त्याला सादर करता यायला हवा, असे नाईक यांनी नमूद केले.  यावेळी त्यांनी कला, कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन, वेशभूषाकार, कला दिग्दर्शक, शॉट्स, कॅमेरा अँगल आदी चित्रपटाशी निगडित विविध संकल्पना सहजसोप्या भाषेत विशद करुन उपस्थितांना तब्बल 6 तास खिळवून ठेवले. 

चित्रपट आणि नाटकाविषयी सखोल माहिती देत त्यांनी उपस्थितांना स्क्रिप्ट देवून त्यावर अभिनय व चित्रीकरणाचे प्रशिक्षण दिले. स्क्रिप्ट टू स्क्रीन ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीकडे वळण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद देत चित्रपट निर्मितीचे धडे गिरवले. चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यापासून चित्रपट निर्माण होईपर्यंतच्या विविध टप्प्यांबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना  नाईक यांनी सविस्तर उत्तरे देत विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेतले.  डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविकातून मास कम्युनिकेशन व पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासन केंद्राच्या वतीने सुरु असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात 12 वी नंतर बी. ए. इन फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रसाद ठाकूर यांनी दिग्दर्शक सुनील नाईक यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले. कार्यशाळेत शंभराहून अधिकजण सहभागी झाले होते. या सर्वांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 स्क्रिप्ट टू स्क्रीन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील नाईक. 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.