पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद…
कोल्हापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन चरित्रावर आधारित पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट आदी प्रयोगात्मक कलाप्रकारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या उद्देशाने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रा.शरद गायकवाड, बबनराव रानगे, माहिती अधिकारी वृषाली पाटील, शाहीर शुभम विभुते, प्रा. सयाजी गायकवाड, बाळासाहेब भोसले, डी. जे. भास्कर, राघु हजारे, प्रकाश पाटील, प्राचार्य टी. के. सरगर, प्रा. संतोष कोळेकर, दत्ता घुटुगडे, शाहिर राजु राऊत, शाहिर विजय शिंदे, टी. एस. कांबळे, आनंद डफडे, मारुती अनुसे, रामा कारंडे, राजेश बानदार, अमोल पांढरे, तसेच चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडीया आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. शरद गायकवाड म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उत्कृष्ट राज्यकारभार केला. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नदीवर घाट बांधले, धार्मिक स्थळांचा जीर्णोध्दार केला. चारधाम यात्रा मार्गावरील रस्त्यांची निर्मिती केली. लोकांना रोजगार निर्माण होण्यासाठी औद्योगिक धोरण आखले. शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी महत्वपूर्ण कार्य केले. तलाव बांधले, अन्नछत्र उभारले यांसह विविध प्रकारचे सामाजिक कार्य करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला. बबनराव रानगे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या धार्मिक असूनही धर्मांध नव्हत्या. त्यांनी गरजू, बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. भुकेल्यांना अन्न दिले. वस्त्रोद्योग सुरु केला. भारतात महिलांची सशस्त्र सेना निर्माण केली. उत्कृष्ट न्यायव्यवस्था निर्माण केली. शास्त्र व शस्त्र हाती घेतले, पण कोणत्याही लढाई शिवाय आदर्शवत राज्यकारभार केला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्वागत शाहीर शुभम विभुते यांनी केले. सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले. आभार प्रा. सयाजी गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या श्रीगणेश वंदन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना तसेच त्यांच्या प्रेरक जीवन चरित्रावर आधारित शाहिरी पोवाडे, लघुपट, धनगरी ओव्या, जोतिबाच्या सासन काठी वर आधारित लेझीम नृत्य, आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात भरघोस प्रतिसाद दिला.