विविध राज्यांच्या लोकनृत्यातून लोकराजाला आदरांजली
‘नृत्यवंदना’ कार्यक्रमाचे शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर: विविध राज्यांतील कलाकारांनी लोकनृत्यातून लोकराजाला आदरांजली वाहिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘नृत्यवंदना’ कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
चित्तथरारक मर्दानी खेळांच्या प्रत्यक्षिकांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमात मध्य प्रदेशाचे अहिर नृत्य सादर करण्यात आले. हे नृत्य मध्य प्रदेशात अहिर जमातीकडून विवाहप्रसंगी सादर केले जाते. तर जन्म व विवाहसोहळ्यामध्ये करण्यात येणारे बधाई नृत्य, कर्नाटकचा पारंपरिक नृत्यप्रकार असणारे डोल्लू कुनिता, गुजरातच्या कोकणा आदिवासी जमातीचे व महाराष्ट्र व गुजरात संस्कृतीचे मिश्रण असणाऱ्या डांगी नृत्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
सातेरी देवीला नमन करण्यासाठी करण्यात येणारे गोवा राज्याच्या कलाकारांनी डोक्यावर ज्वलंत समई घेऊन केलेल्या दिवली नृत्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्राचे कर्बल नृत्य, वारली आदिवासी जमातीचे पारंपरिक तारपा नृत्य, कोळी बांधवांचे वैविध्यपूर्ण कोळी नृत्य, सह्याद्रीच्या घाटउतारावर राहणाऱ्या आदिवासी जमातीचे बोहाडा नृत्य तसेच चैत्र पौर्णिमेला देवीच्या पूजा प्रसंगी सादर होणारे आणि असत्यावर सत्याचा विजय होतो, हा संदेश देणाऱ्या सोंगी मुखवटा नृत्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारी होती.विविध राज्यांच्या लोककलांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.प्रा.निशांत गोंधळी यांनी माहितीपूर्ण निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.