डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय होणे अधिक चिंताजनक…
मुंबई – आदरणीय पवारसाहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्यसरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे , हेच राज्याच्या हिताचे असेल,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
आदरणीय पवारसाहेबांचे संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही असेही अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आदरणीय पवारसाहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, या मागणीचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी यावेळी केला.