वाळूशिल्पातील कोकणातला हिरा – अमित पेडणेकर.
रत्नागिरी – पर्यटन संचालनालय विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जागरण सप्ताहामध्ये 26 मे 2023 रोजी भाट्ये बीचवर वाळूशिल्प साकारले गेले. कलेचा अभ्यासक असल्याने वाळूशिल्प साकारताना पाहण्यासाठी मुद्दाम चिपळूण हून रत्नागिरी ला गेलो. माझ्या माहिती प्रमाणे वाळू शिल्प साकारणारे फार कलाकार कोकणात नाहीत.फारतर 5 ते 10 असतील. यापूर्वी जागतिक कीर्तीचे सुदर्शन पटनायक यांनी गणपतीपुळे व भाट्ये येथे वाळू शिल्प केले होते. ते सुद्धा मुद्दाम पहायला गेलो होतो. पर्यटन वाढीसाठी बीचवर होणारे जे महोत्सव असतात त्यामध्ये वाळू शिल्प प्राधान्याने असावीत. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ती आवश्यकच आहेत.
यासाठी पर्यटन संचालनालय व विवेक व्यासपीठ यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. सकाळी 7.30 ला बीचवर अमित पेडणेकर वाळू शिल्पाची तयारी करत होता. संयोजकांपैकी एखाद दोघे होते.बाकी कलाकार मंडळी पाहायला आलेली दिसली नाहीत. असो जे सी बी ने केलेल्या छोट्या वाळूच्या डोंगरावर अमित ने वाळू शिल्प साकारायला सुरुवात केली. अमितचे हात वाळूत लिलया फिरत होते. ओल्या वाळूचे गोळे थापत त्याला आकार देत अमितच काम सुरू होतं. बेस करतानाच हे सावरकर आहेत हे समजत होतं. बघता बघता सावरकरांचं वाळू शिल्प पूर्ण झालं. Anotomy चा खूप चांगला अभ्यास दिसत होता. म्हणून मी त्याला कुतूहलाने आर्ट्स स्कूल मध्ये कोणती पदवी घेतली आहे ते विचारलं.त्याच्या उत्तराने मी उडालोच तो फक्त 10 वी पास आहे. पण त्याचं काम Phd पेक्षाही मोठं आहे. reference picture न घेता त्याने शिल्प साकारले होते. आदल्या रात्री स्वा. सावरकर आणि भागोजी कीर यांच्या चित्राचा, चेहऱ्याच्या प्रमाण बद्धतेचा त्याने अभ्यास केला होता.
एका रात्रीत चित्राचा अभ्यास करून समोर चित्र न ठेवता हुबेहूब शिल्प साकारणं खरंच ग्रेट त्याची कामातील एकाग्रता, तल्लीनता, कलेप्रती असलेली आस्था मी न्याहळत होतो. मनातल्या मनात तो वाळू जवळ बोलत असावा. दैवी देणगी शिवाय हे असंभव वाळू ओली करायला लागणार पाणी बादल्या भरून तोच आणत होता. 2 तासात त्याने सावरकरांचं शिल्प पूर्ण केलं. पुढच्या 2 तासात भागोजी किरांचं शिल्प पूर्ण केलं. तहान भूक विसरून प्रचंड उन्हात तो काम करत होता. पण त्याने reference picture ची प्रिंट समोर ठेऊन काम करावं जास्त अचूकतेसाठी पण हा वाळूशिल्पातील कोकणातला हिरा आहे. अगदी कोकणचा सुदर्शन पटनायकच म्हणा ना. त्याचं काम पाहताना अचंबित व्हायला होतं. अगदी झोकून देऊन काम चित्रकलेची आवड जोपासत त्याचं क्षेत्रात व्यवसाय करणारा, गणपती कारखाना असणारा, ड्रायव्हिंग व्यवसाय करणारा अमित आपल्या आईला गुरू मानतो. घरच्या सर्वांची या कलेत त्याला साथ मिळते हे तो आवर्जून सांगतो. 2018 पासून तो वाळू शिल्प साकारतोय. जिथे कुठे महोत्सव असतील तेथे अमितला वाळू शिल्प करण्यासाठी आवर्जून बोलवा. एका हाडाच्या कलाकाराला प्रोत्साहन द्या. त्याने बनवलेली कलाकृती आपल्या महोत्सवातील सर्वांत उत्तम कलाकृती नक्कीच असेल.