विनायक जितकर
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी…
दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी आज सोलापूर विमानसेवा सुरु होण्यासंबंधीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर झाल्याने ही विमानसेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकवटले असले तरीही सभागृहात जनतेशी निगडित विविध प्रश्नांवर चर्चा सुरु आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत आज सोलापूर विमानसेवेचा प्रश्न उपस्थित केला. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची ९० मीटर उंचीची चिमणी, स्थानिक संघटनांनी न्यायालयीन लढा देत बेकायदेशीर ठरवली होती. शिवाय ही चिमणी सोलापूर विमानसेवा सुरू होण्यात मुख्य अडथळा ठरली होती.
केंद्र सरकारने उडाण योजनेत सोलापूर शहराचा समावेश करुन, विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन केले होते. पण विमानाच्या टेकऑफच्या वेळी ही चिमणी अडथळा ठरत होती. अखेर १५ जून रोजी ही चिमणी हटवण्यात आली. चिमणी हटवल्यामुळं सोलापूर विमानसेवेतील मुख्य अडथळा दूर झाल्यामुळे आता सोलापुरातून विमानसेवा तातडीने सुरु व्हावी, अशी मागणी आज राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी केली. खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विमानसेवेचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत.