कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारी शिवाजी विठ्ठल शिंदे यांच्या गणवेशावर शोल्डर स्टार लावण्याचा समारंभ काल विद्यापीठात कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.
शिवाजी विद्यापीठातील कायम सेवेतील वरिष्ठ सुरक्षा कर्मचारी शिवाजी विठ्ठल शिंदे यांना कुलगुरू डॉ. कामत यांनी गणवेशावर एक शोल्डर स्टार लावून काम करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांनी श्री. शिंदे यांना सादर केल्यानंतर त्यांच्या गणवेशावर कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते स्टार लावण्याचा समारंभ व्यवस्थापन परिषद सभागृहात पार पडला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह सदस्य डॉ बबन सातपुते, डॉ राजेश निमट, अमरसिंग राजपूत, उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट उपस्थित होते.
शिवाजी शिंदे यांनी भारतीय सैन्य दलात १८ वर्षे सेवा बजावली असून नाईक पदावरुन निवृत्त झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात त्यांनी २३ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे.

























