शिक्षकांचे रोजगार व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणारे संचमान्यतेचे निकष रद्द करा – कौस्तुभ गावडे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचे टाळे ठोक आंदोलन, जोरदार निदर्शने; संचमान्यतेचा फेरआढावा घेण्याची मागणी

कोल्हापूर – उच्च माध्यमिक स्तरावरील अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षकांनी सोमवारी (दि. ३१) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ यांच्या वतीने टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा तीव्र निषेध करण्यात आला. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भात शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेला प्रस्तावित मसुदा अन्यायकारक आहे. या मसुद्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असून अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या सेवासुरक्षेबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारे निकष तातडीने रद्द करून प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करावी, अशी जोरदार मागणी शिक्षक मित्र श्री.कौस्तुभ गावडे यांनी केली. या आंदोलनास कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्हयातील विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.

या आंदोलनात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सहसचिव श्री.दिलीप शितोळे, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सचिव श्री.गोविंद वाघ, श्री बापू दाभाडे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री आण्णासाहेब बागडी, सातारा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.सुनील शिंदे, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सुरेश भिसे, श्री.अभिजीत दुर्गी , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा विभागप्रमुख श्री. शशिकांत काटे, सांगली सहविभागप्रमुख प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, प्राचार्य डॉ.एल.जी.जाधव, प्राचार्य डॉ.अनिल पाटील, श्री. प्रकाश हाके, प्रा.रवी जाधव, श्री हितेंद्र साळुंखे हे उपस्थित होते.  

प्रस्तावित संचमान्यता मसुद्यामध्ये ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करण्याचा निकष सुचविण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध तासिकांच्या गणनेत बदल होऊन मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. तसेच विज्ञान शाखेतील एका बॅचची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करण्याचा प्रस्ताव असल्याने विज्ञान शाखेतील शिक्षकांच्या पदांवरही परिणाम होणार असल्याचे श्री कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थीसंख्येचा निकष प्रस्तावित करण्यात आल्याने अनेक तुकड्या अनुदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यरत शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. प्रवेश प्रक्रियेस लागणारा विलंब आणि तांत्रिक अडचणी यामुळे काही विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतात. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थीसंख्या कमी होऊन शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या आंदोलनादरम्यान अन्यायकारक संचमान्यता तातडीने रद्द करावी, वस्तुनिष्ठ निकषांवर फेरआढावा घ्यावा, कार्यरत शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शिक्षण उपसंचालक स्तरावर प्रचलित निकषांनुसार पारदर्शक ऑनलाईन संचमान्यता प्रक्रिया राबवावी, शिक्षकांच्या सेवासुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन शासनाने प्रस्तावित संचमान्यता धोरणात तातडीने सुधारणा करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनास कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्हयातील शिक्षक बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.