नागाव (ता. हातकणंगले) – नागाव ग्रामपंचायतीतील सर्वांचे लाडके आणि विकास आघाडीचे उत्साही नेते संतोष पाथरे (आप्पा) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. ते ग्रामपंचायत सदस्या सौ. मनीषा संतोष पाथरे (वहिनी) यांचे पती होत.
नागावसह पंचक्रोशीमध्ये ‘आप्पा’ नावाने ओळखले जाणारे संतोष पाथरे हे नेहमी हसतमुख, मदतीस तत्पर आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणींना आपल्या परीने मार्ग काढून देणे, हेच त्यांचे जीवन ध्येय होते. ते म्हणायचे – “पैसेवाल्यांना मदत केली तर ती बातमी होते, पण गरिबाला मदत केली तर ती देवाला मान्य होते.” याच विचारांनी त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
संतोष आप्पा यांच्या निधनाने नागाव व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. इंदिरानगर झोपडपट्टीसह नागाव परिसरातील जनतेसाठी ते आधारवड होते. आज ‘इंदिरानगर झोपडपट्टीचा वाघ’ हरपल्याचे दुःख सर्वांच्या अंत:करणाला चटका लावणारे आहे. आप्पांच्या अकस्मात जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. या कठीण प्रसंगी पाथरे कुटुंबाला धीर देत समाजातील सर्व घटक त्यांच्यासोबत उभे आहेत.













































