राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र…
मुंबई – फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक नि टंकलेखक या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती मात्र टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रक आयोगामार्फत निर्गमित केले आहे. याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे लक्ष वेधले आहे.
टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान फार कमी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यामुळे तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचीच चाचणी पुन्हा घ्यावी. टंकलेखन कौशल्य चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून अशा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा देण्यात यावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.