जिल्ह्यात सकारात्मक विचाराने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची टीम; पालकमंत्र्यांनी केले कौतुक
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, अद्ययावत तंत्रज्ञान आदी सर्व बाबींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात हा आराखडा मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आपदा सखी व आपदा मित्र यांना आपत्ती व्यवस्थापन साहित्य संच देण्यात येत आहेत. या साहित्याचे वाटप पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वीर माता, वीर पत्नींना शासकीय जमीन वाटपाचे आदेश पालकमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच वीर माता, वीर पत्नी व जिल्ह्यातील आपदा सखी व मित्र उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या दालनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन तसेच देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, साधारण 26 जुलै पर्यंत च्या काळात कोल्हापुरात पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सर्वजण मिळून डोळ्यात तेल घालून काम करुया. कोल्हापूर जिल्ह्यात आपदा सखी म्हणून मुली देखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचाव कार्यात पुढे होत असतात, ही अभिमानाची बाब आहे. धाडस, प्रचंड उत्साह, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती या सर्व गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या आपदा सखी व आपदा मित्रांचे काम उल्लेखनीय आहे. याबरोबरच सर्वसामान्यांच्या हितासाठी सकारात्मक विचाराने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची टीम कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक विषय मार्गी लागत आहेत. तथापि सर्व कामे जलद गतीने व अधिक चांगली, दर्जेदार करुया आणि राज्यासमोर नवा आदर्श निर्माण करुया, असे आवाहन पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी केले.
निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्तीमध्ये देखील आपदा मित्र व आपदा सखींनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुन जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात आपदा मित्र उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाची उपयुक्तता पाहता केंद्र सरकारच्या वतीने हा उपक्रम देशभरात राबविण्यात आला. जिल्ह्यातील आपदा मित्र व आपदा सखींच्या चौथ्या बॅचचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे घेण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या 203 आपदा मित्र व आपदा सखीना आपत्ती व्यवस्थापन साहित्य देण्यात येत असून निसर्गनिर्मित आपत्तींबरोबरच मानवनिर्मित आपत्तीमध्ये देखील आपदा मित्र व आपदा सखींनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.