शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली…
कोल्हापूर – शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात होण्यासाठी तालुकास्तरीय मेळावे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी बैठकी दरम्यान दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक “छत्रपती शाहू सभागृह” जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.
या वेळी बैठकीला अग्रणी जिल्हा बँक प्रबंधक गणेश गोडसे, महाप्रबंधक जिल्हा उद्योग केंद्र अजय पाटील, जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव, कौशल्य विकास विभागचे माळी, सर्व महामंडळाचे पदाधिकारी व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. बैठकीस सर्व तालुक्यांचे तहसीलदार व प्रांत अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या विभागाचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहिती घेऊन या सर्व योजनांचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहण्याचा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,कृषी विभाग, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ आदी विभाग यात सहभागी असतील.
जिल्ह्यातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित रहावे. विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागांच्या योजनाबद्दल माहिती सविस्तरपणे देतील. माहिती पत्रक व कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देतील तसेच आवश्यकतेनुसार त्याच ठिकाणी कर्ज प्रस्ताव दाखल करून घेतील किंवा उर्वरित कागदपत्राबद्दल मार्गदर्शन करतील.
शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली त्याच वेळी मिळणार आहे. सदरचे मेळाव्यांमध्ये नागरिकांच्या विविध कर्जप्रकरणांतील त्रुटी दूर करण्यासाठी बँकांचे अधिकारी मदत करतील. सर्व तहसीलदारांना तालुकास्तरीय मेळाव्यांचे नियोजन व प्रचार प्रसिद्धी मिळाव्यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
















































