गडहिंग्लज पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
गडहिंग्लज : अपघात प्रकरणातील वाहन सोडवून देण्यासाठी तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करण्याच्या मोबदल्यात ६० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक निता शिवाजी कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर युनिटने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांचे मुलाचे विरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल असून वाहन जप्त करण्यात आले होते. सदर वाहन सोडवण्यासाठी व गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी तडजोडी अंती ४० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी करून ५ जुलै रोजी पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. आरोपीने पंचासमक्ष ४० हजार रुपये घेताच तिला रंगेहात पकडण्यात आले.
सापळा कारवाईत आरोपीकडून लाच रक्कम, एक व्हीओ कंपनीचा सोनेरी रंगाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या राहत्या घरी केडीसी बँक कॉलनी, गडहिंग्लज येथे पथकाने घरझडती घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.
या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले. त्यांना पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि. पुणे) व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी पर्यवेक्षण केले.
लाच मागणीच्या प्रकरणात नागरिकांनी तत्काळ www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी अथवा १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.