जी. जी. पाटील (शिराळा)
सांगली जिल्ह्यातील औंढी या गावी सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला.
शिराळा : भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील औंढी या गावी सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी याठिकाणी जागतिक क्रिकेट दिन म्हणून यापुढे २४ एप्रिल मानला जाईल अशी घोषणाच करून टाकली. गावातून पालखीसह सवाद्य मिरवणूक काढून तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.
हेच गाव का? तेंडल्या चित्रपट एक राष्ट्रीय आणि पाच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहे. तेंडल्या’चा दिग्दर्शक सचिन जाधवचे बालपण या औंढी गावात गेले. सिनेमातील अनेक घटना या गावात घडलेल्या असल्याने सचिन तेंडुलकरच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी या गावाची निवड करण्यात आली होती. एकूणच ‘तेंडल्या’च्या निर्मितीप्रक्रियेत या संपूर्ण गावाचे योगदान मोठे असल्याची भावना सचिन जाधवची आहे. |
सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अखंड औंढी गावात सणाचे वातावरण होते. प्रत्येक घराच्या चौकटीत गुढी उभारण्यात आली होती आणि रांगोळी काढण्यात आली होती. गुढीवर बॅट लावल्या होत्या. त्यावर ‘तेंडल्या’चे स्टिकर होते. गावाच्या एका टोकावरील हनुमान मंदिरापासून प्रत्यक्ष मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीत सचिन तेंडुलकर यांचा अर्धपुतळा होता. गावातील महिलांचे लेझीमपथक होते. हलगी आणि तुतारीच्या निनादात दिंडी सुरू झाली. डोक्यावर तुळस घेऊन महिला अग्रभागी होत्या. रस्त्यावरून मिरवणुकीदरम्यान पालखीवर फुलांची उधळण करण्यात येत होती. जागोजागी अंगणात महिला औक्षण करत होत्या. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत पालखीचा समारोप झाला. याठिकाणी सचिन तेंडुलकर यांच्या मोठ्या कटआउटचे अनावरण करण्यात आले. सचिनचे आवडते खाद्य वडापाव असल्याने याठिकाणी त्याने आतापर्यंत मारले शंभर शतकांची दखल घेत शंभर वडापाव चा नैवेद्य दाखवण्यात आला. तिरंगी रंगात रंगलेल्या चिमुकल्या शाळकरी पोरांनी तेंडल्या चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. जुन्या पद्धतीच्या चलचित्रफीतीच्या माध्यमातून यावेळी सचिन तेंडुलकरला तेंडल्या हा चित्रपट समर्पित करण्यात आला. ज्येष्ठ क्रिडा पत्रकार सुनंदन लेले यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगत यापुढे अधिकृत कुणी घोषणा करो अथवा न करो, आम्ही मात्र ‘जागतिक क्रिकेट दिन’ म्हणून आजचा दिवस घोषित करत असल्याचे श्री. लेले यांनी जाहीर केले. गावातील ग्रामस्थांमध्ये अपूर्व उत्साह संचारला होता. लहान मुलांपासून वृद्ध पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिग्दर्शक सचिन जाधव, चैतन्य काळे, नचिकेत वाईकर, मुख्य कलाकार फिरोज शेख व अमन कांबळे, संजय कांबळे, राजू कांबळे, बाबासो पाटील, मोहन पाटील, भाऊसो पाटील, विजय पाटील, बाळकृष्ण पाटील, कृष्णा पाटील, विकास पाटील, प्रवीण जाधव, संतोष पाटील, बी. जी. पाटील, सरपंच चेतन पाटील, सुहास पाटील, कालीदास पाटील, सुनील पाटील, राजू देसाई, अधिक खोत आदी उपस्थित होते.