दहावी, बारावीचे निकाल लागले की जून, जुलै महिन्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यांना ऊत येतो. विविध राजकीय पक्ष, विविध समजाच्या संघटना, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा प्रकारची मंडळवाले यांना कधी एकदा गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार करतो असं होऊन जातं. गल्लीबोळापासून तालुका, जिल्हा अशा स्तरावर सत्कार समारंभ आयोजित केले जातात. जून, जुलैमध्ये सत्कार करणारे आणि सत्कार घेणारे यांची नुसती लगबग उडालेली दिसते. गुणवंत विद्यार्थी असेल किंवा महिला, पुरुष असेल, कलाकार, खेळाडू असतील, समाजसेवक असतील, आणखीही विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील अशांचा गौरव करणं आवश्यक असतंच. त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळते तसेच बाकीच्यांनाही प्रेरणा मिळत असते. ही सुसंस्कृत, सुदृढ समाजासाठी गरजेची गोष्ट निश्चितच आहे यात दुमत असण्याचे कारण नाही, पण… पण आजकालचे सत्कार सोहळे (अपवाद सोडले तर )म्हणजे अक्षरशः भीक नको पण कुत्रा आवर अशा पद्धतीने होताना दिसतात. गुणवंतांच्या सत्कारापेक्षा आयोजकांना, पाहुण्यांना स्वतःला मिरवून घेण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आपल्याला मिरवून घेता यावे म्हणून राजकीय, समाजाचे पुढारी असे सोहळे आयोजित करतात. त्यांच्या लेखी गुणवंत क्षुल्लक असतात. यांच्या मिरवण्याचं आणि वर्षभरातला एखादा कार्यक्रम घेतल्याचा फार्स पूर्ण करण्याचं ते साधन असतात. सत्कार सोहळा कोणाचाही असो त्यात बेशिस्त, नियोजनशून्यता, बेजबाबदाऱपणा, मोठेपणाचा हव्यास अशा गोष्टी हमखास दिसून येतात. चांगले शिकलेसवरलेले लोकंही अशी वागतात तेव्हा त्यांची कीव करावी वाटते, चिडही येते. या सत्कार सोहळ्यांना वेळेचे तर साफच वावडे असते. गुणवंत म्हणून आलेल्या व्यक्ती असतील, विद्यार्थी असतील ते आपले सत्काराच्या आशेने वेळेत येऊन बसतात. लहान मुलं असतील तर त्यांचे आईवडील आलेले असतात. पण त्यांना ताटकळत ठेवणे म्हणजेच सत्कार अशी भावना आयोजकांची असते. राजकीय पक्ष म्हटले तर आमदार, खासदार, मंत्री नाहीतर नेते हवेतच. या लोकांनी आयुष्यात एक प्रतिज्ञाचं केलेली असते… कधीही वेळेत पोचायचे नाही… तास, दोन तास उशीर झाला नाही तर कमीपणा येतो. समोरची पोरं, त्यांचे आईबाप कुठून, कसे, कधीपासून येऊन बसलेत याचे भान ठेवायचेच नाही असं पक्क ठरवलेलं असतं. या नेत्यांच्या चमचे मंडळींची तर त्याहून ताण.. नेत्याच्या मागेपुढे करण्यात काय ‘ पराक्रम ‘ असतो तो त्यांनाच माहित. नेता किंवा नेते येणार निवांत.. मग त्यांच्या हारतुऱ्यात वेळ जातो. मुलांचा आधी सत्कार केला तर निघून जातील लोकं म्हणून आधी सगळ्यांची भाषणे झाली पाहिजेत. एवढा उशीर होऊन समोरची पोरं भुकेने व्याकुळ झालेली, बसून बसून कंटाळलेली असतात, काही तिथेच पेंगत असतात तरीही हवशे, गवशे, नवशे आणि शेवटी मुख्य पुढारी आपल्या भाषणाची खाज पूर्ण भागल्याशिवाय माईक सोडत नाहीत. त्यातच बारीक सारिक पुढारी येतील तसे त्यांना स्टेजवर बोलवायचे, स्वागत करत रहायचे, स्टेजवर जागा नसली तरी खेटून खेटून खुर्च्या लावायच्या असले चित्र विचित्र प्रकार चालू असतातच. या सगळ्या भानगडीत मूळ कार्यक्रम दोन तीन तास लांबलेला असतो, कुठून झक मारली आणि सत्कार सोहळ्याला आलो अशी मनस्थिती विद्यार्थी आणि पालकांची झालेली असते. चला, उठा… सज्ज व्हा!…बुडण्यासाठी!! ही बातमी देखिल जास्त वाचली गेली. तुन्हीही वाचा.. बरं एवढं सगळं करून मुख्य नेता जो कोण असेल त्याला लगेच दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असतं. मग घाईघाईत दोनचार पोरांना स्टेजवर बोलवायचं, त्यांना काहीतरी द्यायचं, फोटो काढायचा की नेते जातात. त्यांच्याबरोबर लहानमोठे पुढारी, कार्यकर्ते कमी चमचे जास्त निघून जातात. खरा कार्यकर्ता जागेवरच असतो, तो कार्यक्रम सुरळीत करण्यासाठी धडपडत असतो, पण एकंदर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. नेते गेल्यावर सत्कार सोहळा म्हणजे अक्षरशः आठवडा बाजार ठरतो. कोणाला कोणाचा पायपोस नसतो. फटाफट काय चार वह्या, पेन, फार टिकणार नाही अशी सॅक असलं काहीतरी दिलं जातं. काय चाललंय हे ना आयोजकांना कळत ना सत्कार घ्यायला आलेल्याना कळत. वर्षभरातला एक कार्यक्रम उरकल्याचे आणि मीडिया किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाल्याचे ‘खोटे ‘ समाधान मात्र नक्कीच मिळते. चटावरचं श्राद्ध उरकतात तसे सत्कार सोहळे अक्षरशः उरकतात. ज्यांचा गौरव करायचा त्यांना काही महत्व नाही. त्यांना बोलायला संधी नाही. त्यांच्या यशाची गाथा ऐकण्याची संधी उपस्थिताना नाही. किती सत्कार घ्यावेत, काय निकष असावेत याचा विधिनिषेध नाही. पन्नास टक्केवाला पण त्याच्यातच आणि नव्वद टक्केवाला पण त्याच्यातच…घाऊकमध्ये कार्यक्रम उरकणे आणि त्यातून स्वतःचा मोठेपणा साधणे एवढाच काय तो उद्देश! ता. क. यापुढे सत्कार सोहळा नियोजित वेळेत फारफारतर ‘आपल्या शिस्तीप्रमाणे ‘ अर्धा तास उशिरापर्यंत सुरु झाला नाही, भाषण करणाऱ्यांनी वेळेचे भान ठेवले नाही, सत्कार योग्य पद्धतीने होत नाही असं दिसून आलं तर चोख स्वाभिमान दाखवून, संयोजकांचा निषेध करून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवली पाहिजे. तरच संयोजक सुधारतील आणि सत्कार सोहळे खऱ्या अर्थाने साजरे होतील. नाहीतर त्यांचा आठवडा बाजार झाला आहेच… *मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण. |