अवघ्या 24 तासातच 319 ग्राहकांना दिली विजजोडणी…
पुणे – उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा तत्परतेने पुरवण्याच्या सूचनेला अनुसरून नवीन वीजजोडणी तत्काळ देण्यासह बिलदुरुस्ती, फ्यूज कॉल व दुरुस्तीच्या कामांचा निपटारा वेळेत करण्यात येत आहे. ग्राहक सेवेला केंद्रबिंदु मानून महावितरणने आपल्या कामात लक्षणीय सुधारणा केलेल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे एप्रिल 2023 पासून आजतागायत महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करून सर्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या 319 ग्राहकांना अवघ्या 24 तासांच्या आत नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
सोबतच महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी तात्काळ वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या असून वरिष्ठ पातळीवर याचा नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार मागील एप्रिल महिन्यात 74, मे महिन्यात 51, जून महिन्यात 93 व जुलै या चालू महिन्यात 101 ग्राहकांना अवघ्या 24 तासात वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यानुसार एप्रिलपासून बारामती परिमंडळात 157, कोल्हापूर परिमंडळात 63 व पुणे परिमंडळात 99 ग्राहकांना 24 तासात वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
नवीन वीज जोडणी देण्यासाठी पायाभूत वीज यंत्रणा उभारणीची आवश्यकता नसलेल्या सर्व वीज जोडण्या 24 तासाच्या आत देण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिल्याने गेल्या तीन ते चार महिन्यात 319 ग्राहकांना 24 तासात वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.