शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन राजर्षी शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात येणार.
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 निमित्त दिनांक 6 ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा दिनांक 6 ते 14 मे, 2023 अखेर सकाळी 10.00 ते रात्री 10.00 पर्यंत विविध स्टॉल सर्व नागरिकांसाठी खुली राहणार. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 निमित्त आयोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे….दिनांक 6 मे रोजी शाहू समाधी स्थळ येथे सकाळी 9.30 वाजता शाहू समाधी स्थळ मानवंदना, 10.00 वाजता राजर्षी शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात येणार आहे. शाहू मिल येथे 10.30 वाजता स्मृती शताब्दी सांगता कार्यक्रम व कृतज्ञता पर्व 2023 उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता चित्रपट “छत्रपती शिवाजी” 1952 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता लोककला व स्थानिक पारंपारिक कलाकार हा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 7 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 9.30 वाजता शाहू महाराज यांना कोल्हापुरातील मान्यवर चित्र शिल्पकारांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता चित्रपट “माणूस” 1939 दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता चित्रपट “भूपाळी ते भैरवी” महाराष्ट्राचा लोकजागर हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
दिनांक 8 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य राजेंद्र हंक्कारे यांची कॅलिग्रॅफी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता “ध्यासपर्व” 2001 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू महाराजांना शाहीरी मुजरा (शाहिरी पोवाडा) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 9 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. मंदार वैद्य यांचे पेपरक्राफ्ट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता “गांधी” 1982 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता वारसा समृध्द कलेचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 10 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. सत्यजित निगवेकर यांची माती शिल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता “महात्मा फुले” 1954 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 11 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. गौरव काईंगडे यांची मातीकाम (पॉटरी कले) बद्दलचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता “आनंदी गोपाळ” 2019 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता राजा माझा रयतेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 12 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. चेतन चौगुले यांची चित्ररेखांकन आणि रंगकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” 2000 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नागपूरद्वारा आयोजित विविध राज्यातील लोक कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे.
दिनांक 13 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. भाऊसो पाटील यांचे ॲनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान याबद्दल प्राथमिक माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता “सिंहासन” 1979 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नागपूरद्वारा आयोजित विविध राज्यातील लोक कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. दिनांक 14 मे रोजी शाहू मिल येथे “देवकीनंदन गोपाला” 1977 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नागपूरद्वारा आयोजित विविध राज्यातील लोक कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे.
याबरोबरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रसिद्ध वस्तू, विविध उत्पादने यांचे प्रदर्शन व विक्री शाहू मिल येथे आयोजित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तु, घोंगडी, जान, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादने आणि विशेष म्हणजे आंबा महोत्सव आयोजित केला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणारे, कोल्हापूरचा औद्योगिक, शिक्षण, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांचा विकास दर्शविणारे व विविध शासकीय योजना संबधी माहिती देणारी दालने असणार आहेत. सदरची दालने ही दिनांक 6 ते 14 मे, 2023 अखेर सकाळी 10.00 ते रात्री 10.00 पर्यंत सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहेत.
सर्व ठिकाणी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच येते थाटण्यात आलेल्या विविध स्टॉलना भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.