राधानगरीतील दोन जबरी चोरीचे गुन्हे उघड; ९० ग्रॅम सोनं, दुचाकी असा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : जिल्ह्यात शेतामध्ये काम करणाऱ्या गोर-गरीब वयोवृद्ध महिलांवर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून तब्बल ९० ग्रॅम सोनं, दुचाकीसह सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील या दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील वाढत्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व झालेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पथकाने तपास सुरू ठेवला होता.
चालू व मागील वर्षात राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर व चक्रेश्वरवाडी परिसरात वयस्कर महिला — सोनाबाई पाटील (वय ६५) व मंगल नरके (वय ६०) — या शेतात काम करताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक हिसकावण्यात आले होते. या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी रेनकोट घातला होता. त्यामुळे तपास आव्हानात्मक ठरत होता.
दरम्यान, पथकातील अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना गोपनीय माहिती मिळाली की, राधानगरीतील जबरी चोरीचे गुन्हे करणारा संशयित नामदेव शिवाजी पाटील (वय ३४, रा. चक्रेश्वरवाडी) कोल्हापूर शहरातील आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत परिसरात स्प्लेंडर मोटरसायकलवर फिरत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून ९० ग्रॅम वजनाचे दोन चिताक आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर दुचाकी असा एकूण सुमारे ९,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी पुढील तपासासाठी राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या कारवाईत राधानगरी पोलीस ठाण्याचे खालील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत —यामध्ये गुन्हा र. क्र. २०८/२०२५ (बीएनएस ३०९(६)) मध्ये ४० ग्रॅमचे चिताक व गुन्हा र. क्र. ३७/२०२४ (भा.दं.वि. ३९२) मध्ये ५० ग्रॅमचे चिताक असा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार, सागर माने, संजय देसाई, लखनसिंह पाटील, महेश पाटील, महेश खोत, विजय इंगळे, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, अशोक पोवार, प्रकाश पाटील, अमित सर्जे, सागर चौगले, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे. |