कोल्हापूर : शहरातील वाहतूक शिस्तीला प्राधान्य देत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रिक्षाचालकांवर धडक कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १५१ रिक्षांवर कारवाई करून सुमारे ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरात रिक्षा स्टँडवर क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा उभ्या करणे, चौक-चौकात अनधिकृत थांबे करणे, एस.टी. स्टँड परिसरात तसेच इतर ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने प्रवासी उचलणे, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल. अशा पद्धतीने रिक्षा चालविणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार दि. १५ ते १६ एप्रिल दरम्यान शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. यामध्ये गणवेश न घालणे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, परवाना जवळ न बाळगणे, अनधिकृत ठिकाणी रिक्षा उभी करणे, भाडे नाकारणे आदी उल्लंघनांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनीही अधिकृत भाडेच देणे, तसेच नियमबाह्य प्रकार आढळल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.























































