कोल्हापूर WATCH TEAM: आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची विक्री व साठवणूक करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. विनापरवाना फटाका विक्री, अनधिकृत स्टॉलची उभारणी तसेच रहिवासी भागात फटाक्यांची साठवणूक किंवा विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आला आहे.
हिंगोली दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क शहरात दिवसेंदिवस आग व आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच नुकतीच हिंगोली शहरातील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच परवानाधारक व अनधिकृत फटाका विक्रेत्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. फटाके अतिशय ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे असल्याने फटाका विक्रीबाबत उच्च न्यायालय, नगरविकास विभाग आणि गृह विभागाने वेळोवेळी दिलेले आदेश, स्फोटक नियम २००८ आणि पर्यावरणविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कुठे आहे विक्रीस बंदी? तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्रीसाठी दुकानांसमोर मंडप उभारण्याकरिता महापालिकेकडे अर्ज सादर केले जातात. मात्र, जनहित याचिका क्र. १५२/२०१५ अन्वये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच शासन निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींमध्ये व गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री आणि साठवणूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
अनधिकृत स्टॉलवर कारवाईचे निर्देश शहरातील काही ठिकाणी अद्यापही अनधिकृत स्टॉल उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे स्टॉल संबंधित विभागीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या स्तरावर तातडीने हटविण्याचे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिले आहेत. तसेच रहिवासी भागात किंवा विनापरवाना फटाक्यांची विक्री होत असल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
नियम पाळा, प्रशासनाला सहकार्य करा आणि आपली व इतरांची दिवाळी सुरक्षित व आनंदाने साजरी करा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
























