उद्योगांना मिळणार ‘पॉवर बूस्ट’! कागलमध्ये नवे वीज उपकेंद्र..कोल्हापूरच्या उद्योगांना दिलासा; वीज उपकेंद्राचे काम वेगाने!

कोल्हापूर (WATCH TEAM) : कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला सुरळीत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडून वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. कागल एमआयडीसीतील सी ब्लॉकमधील २० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. तसेच कागल एमआयडीसीतील १०० एमव्हीए क्षमतेच्या महापारेषण अति उच्चदाब केंद्रासाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.

महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ऊर्जा शक्ती सभागृहात १७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते.इचलकरंजीतील शहापूर आणि नाईकमळा येथे प्रस्तावित प्रत्येकी २० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्रांसाठी जागा अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून काम लवकर सुरू करण्यात येईल, असेही औंढेकर यांनी सांगितले.

औद्योगिक वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणावर भर

औद्योगिक ग्राहक हा महावितरणच्या महसुलाचा महत्त्वाचा आधार असल्याचे नमूद करत औंढेकर म्हणाले की, उद्योगांच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली वीजयंत्रणेची सक्षमीकरणाची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी अभियंत्यांना दिल्या.

राज्यातील सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढीमुळे औद्योगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होत आहे. तसेच वीज खरेदीतील बचतीसह विविध उपाययोजनांमुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदर कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इचलकरंजीतील उद्योगांसाठी शिडी गाडी

बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांच्या विविध मागण्या आणि अपेक्षांवर चर्चा झाली. इचलकरंजी विभागातील उद्योगांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे सुलभ व्हावीत, यासाठी शिडी गाडीची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे औंढेकर यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे मोहन कुशिरे, विठ्ठल पाटील, शंतनू गायकवाड, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे बदाम पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संजय देशिंगे, अमोल यादव, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन उद्यमनगरचे कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे, सीआयआय साउथ चॅप्टरचे वीरेंद्र पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे महम्मद रफिक खानापुरे, सतीश कोष्टी, पी. डी. सोलगे तसेच अधीक्षक अभियंते गणपत लटपटे आणि अमित बोकील उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.