विनायक जितकर
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी व ऋतुजा गंभीर यांचे संशोधन…
कसबा बावडा – रुग्णाचे जलद रोग निदान करणाऱ्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे. आता शक्य होणार आहे. विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि त्यांच्या रिसर्च स्टुडट ऋतुजा गंभीर यांनी रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पद्धती विकसित केली आहे. विद्यापीठाने मिळवलेले हे २४ वे पेटंट आहे.
डॉ. अर्पिता पांडे-तिवारी व रिसर्च टीमने तयार केलेल्या ‘अ मेथड फोर आरएनए आयसोलेशन फ्रॉम व्हायरल/ ह्युमन सिरम संपल्स युझिंग फंक्शनलाईज्ड मॅग्नेटीक आयर्न नॅनो पार्टिकल’ नावाच्या पद्धतीसाठी हे पेटंट जाहीर झाले आहे. भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे ऑगस्ट २०२२ मध्ये यासाठी अर्ज केला होता. पुढील २० वर्षासाठी ही पद्धत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे संरक्षित राहील.
सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार रोग निदान करण्यासाठी रक्त वा स्त्रावाचे नमुने घेतल्यानंतर त्याचे निदान होण्यासाठी काही तासांचा कालावधी लागतो. प्रशिक्षित कर्मचाऱ्याची गरज, रासायनिक घटक, किटची किमत आदीमुळे ही प्रक्रिया खर्चिकही आहे. मात्र, डॉ. अर्पिता पांडे-तिवारी व व रिसर्च टीमने संशोधित केलेल्या नव्या निदान पद्धतीमध्ये निदान जलद होणार असून मॅग्नेटीक नॅनो पार्टिकल्सची ही प्रक्रिया आर्थिक दृष्ट्या स्वस्त, अत्यत प्रभावी आणि पर्यावरण पूरकही ठरणार आहे.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.