सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे कायम; महापालिकेचा हातोडा नेमका कधी? — रविकिरण इंगवले 

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

२०१२ पासूनचा लढा निर्णायक टप्प्यात; कारवाईत दिरंगाई झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर – तावडे हॉटेल व गांधीनगर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांच्या प्रश्नावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर तातडीने हातोडा चालवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे करण्यात आली.

जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि तालुकाप्रमुख राजू यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शिवसेनेने २०१२ पासून या बेकायदेशीर बांधकामांविरोधात सातत्याने लढा उभारला आहे. आंदोलने, गांधीनगर बंद, पाठपुरावा आणि न्यायालयीन संघर्षानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता प्रशासनाने कोणतीही कारणे न देता संबंधित अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या बांधकामांना मोठी चपराक आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कारवाईस विलंब न करता ही अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत,” अशी भूमिका शिवसेनेने मांडली.

यावेळी प्रशासनाला इशारा देताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जर या बेकायदेशीर बांधकामांना अभय देण्याचा प्रयत्न झाला किंवा कारवाई टाळली गेली, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. तसेच, या बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासनाने कारवाईत टाळाटाळ केल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे. यावेळी मंजित माने, राजू सांगावकर, सागर साळोखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.