![]() |
![]() ![]() |
![]() |
![]() |
रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली,गगनबावड्याला जाणाऱ्या रस्त्याची जुनी ओळख. कडक उन्हात प्रवाशांना थंडगार सावली देणारी कितीतरी झाडं, जमीनदोस्त करण्यात आली. पाडलेल्या झाडांच हे विदारक दृश्य पहात आपण गगनबावड्याच्या एस टी स्थानकासमोरील चौकात येतो. तर…प्रगत माणसाने केलेल्या नवीन रस्त्याची धूळ अंगावर वागवत,एकांडया शिलेदारासारखा उभा हा ‘ वारस ‘ वृक्ष. आता याला हे नाव असे कसे पडले? हे काय आपल्याला माहित नाही. याला कन्नड मध्ये अडवी नुग्गी,बेचाडी मारा, कलीगोट्टू मारा,तामिळमध्ये बारा कलोगोरु, तेलगूमध्ये बॅरी कलीकोड, बोनडुगू, कापा गरगु अशी नाव आहेत. सगळं अंग धुळीने माखले असले तरी वरच्या अंगाला पांढऱ्या फुलांवर ती धुळ पडू शकलेली नाही. हे लक्षात आलं.’ प्रगतीच्या नावाखाली तुम्ही आमच्यावर कितीही वार करा. अन्याय करा. एकटे असू तरी नेटाने लढू. परत एकदा आमचा वंश वाढवू.आम्ही चालवू हा पुढे वारसा ‘ असं तर सांगायच नसेल या शिलेदाराला.
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा… खरंच सह्याद्रीच्या कुशीत केंव्हाही जा. कोणत्याही ऋतूत,कोणत्याही दिवशी,कोणत्याही वेळी. तो तुम्हाला आपल्या विविध रूपांची भुरळ पडतोच. अंजणीच्या फुलांचे लहान लहान गुच्छ एकमेकांना इतके खेटून बसतात. प्रश्न पडतो की, एवढ्या उन्हात यांना असं बसून उकडत नसेल ? पण ते त्यांच तसं असणच सर्वांना आकर्षित करतं.याला आसामीमध्ये ललीदीमाबोफांग, हिंदी , मराठी , संस्कृतमध्ये अंजन, कन्नडमध्ये ओललाकुडी, मल्यालममध्ये कान्ना, इजुआबू ,ओरियात नेमारू, तमिळमध्ये काया, तेलुगूत अल्ली तुल्लू ,अलिमारु अशी नाव आहेत. अंजणीच्या फुलांचा मध गुणकारी मानला जातो. जांभळ्या रंगाच्या असंख्य छटा लपेटून मनमोहित करणारी ही फुलं एकदा पहिलीच पाहिजेत. |
– मिलिंद यादव– काेल्हापूर