पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणांचे वाटप
गारगोटी प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून गारगोटी (ता.भुदरगड) येथील संपर्क कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणांचे वाटप के.डी.सी.सी. बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, सभापती विक्रम पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली. त्यानंतर गरजू ज्येष्ठ नागरिकांना काठी, वॉकर, व्हीलचेअर, कंबरेचा पट्टा यासह विविध सहाय्यक उपकरणांचे प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना अर्जुन आबिटकर म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीत आयुष्य खर्ची घालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतारवयात आधार देण्याच्या उद्देशाने सहाय्यक उपकरणांचे भव्य वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या सुखसोयींची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबविले जातील.
यावेळी गोकुळचे माजी संचालक नंदकुमार ढेंगे, उपसभापती अरुणा देसाई, नगरसेवक अभिजीत खतकर, पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, बी.एस.खापरे, माजी उपसभापती अजित देसाई, गारगोटी उपसरपंच भरत शेटके, दीपक देसाई, सागर शिंदे, किरण पिसे, राजेंद्र चिले, अल्ताफ बागवान, पांडुरंग कांबळे, दिगंबर देसाई, रमेश पाळेकर, संतोष पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भोई यांनी केले, तर तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांचे आभार मानले.



























