पारंपारिक कुंभार कामाला मिळणार आधुनिक झळाळी डॉ. सुनील रायकर व विद्यार्थ्याचे संशोधन… तयार केलेला थ्रीडी प्रिंटर आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू.
कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यानी विभागप्रमुख डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक थ्रीडी क्ले प्रिंटरची निर्मिती केली आहे. या प्रिंटरमध्ये ऍडिटिव्ह मॅनुफॅक्चरिंगचे लेयर-बाय-लेयर तंत्र वापरून मातीपासून वेगवेगळ्या डिझाईनच्या वस्तू अचूकपणे तयार करणे शक्य झाले आहे. पारंपारिक कुंभार व्यवसायात या तंत्राचा वापर करून त्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे डॉ रायकर यांनी सांगितले.
येत्या काही वर्षांत जगभरातील विविध उद्योगांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग एक अविभाज्य भाग बनेल. या क्षेत्रात सातत्याने संशोधन सुरु असून त्याचाच एक भाग म्हणुन डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुनिल जयसिंग रायकर आणि विद्यार्थी अमृत उत्तम नरके, प्रतिक उदय चोडणकर, मयुरेश अरुण गावडे, प्रतिक एकनाथ पाटील, साईराज महेश भिसे, प्रथमेश राजेंद्र आरगे, सौरभ वसंत केसरकर, साकिब सज्जाद मोमीन, नवमन समीर मोमीन, , पार्थ संतोष पाटील, ऋतुराज राहुल ससे, श्रेयस गिरीश माळी, रजत वैभव जाधव व सुयोग संदीप जगदाळे यांनी डेल्टा प्रकारातील या अत्याधुनिक थ्रीडी क्ले प्रिंटरची रचना आणि निर्मिती केली आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात डॉ. रायकर हे विकिफॅक्टरी ह्या पोर्टल वर काही संशोधकांच्या ग्रुपला कनेक्ट झाले व त्यातून त्यांना जोनाथन कीप या संशोधकाने थ्रीडी प्रिंटिंगमध्ये केलेल्या संशोधनाची माहिती मिळाली. त्यांनी विकसित केलेला सिरॅमिक प्रिंटरने त्यांना आकर्षित केले. त्यातून थ्रीडी क्ले प्रिंटरची कल्पना त्यांना सुचली. त्यानुसार गेले आठ महिने त्यावर मेहनत घेतली. विद्यार्थ्यानी कोल्हापुरातील कुंभार गल्ली व इतर ठिकाणी भेट देऊन मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची प्रक्रियेची माहिती घेतली. प्रथम त्यांनी मातीपासून प्लास्टिक पेपर पासून कोन करून लेयर-बाय-लेयर तंत्र वापरून हातानेच काही साध्या वस्तू केल्या. त्याला यश आल्यानंतर महाविद्यालयाच्या डिझाईन व इनोव्हेशन लॅबमध्ये थ्रीडी क्ले प्रिंटरचे डिझाईन व निर्मिती करण्यात आली.
हा प्रिंटर खरोखरच तांत्रिक कल्पकतेचा एक उल्लेखनीय नमुना आहे. या नावीन्यपूर्ण शोधामुळे अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात नवे पाउल पडले आहे. या प्रिंटरच्या मदतीने विद्यार्थ्यानी मातीपासून अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत. भविष्यात या प्रिंटरमध्ये मॉडिफिकेशन्स करून त्याला व्यावसायिक रूप कसे देता येईल यावर संशोधन चालू आहे. या क्ले प्रिंटरचे पेटंट करणे तसेच पारंपारिक कुंभार व्यवसायात वापर करून या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी काम सुरु असल्याचे डॉ. सुनिल रायकर यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील व पृथ्वीराज संजय पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता, प्राचार्य एस. डी. चेडे, रजिस्ट्रार लीतेश मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.