दोन्ही तालुक्यातील वर्षानुवर्ष डोंगर माथ्यावर असणारे पडीक क्षेत्र येणार ओलिताखाली…
गारगोटी प्रतिनिधी – भुदरगड व राधानगरी तालुक्यातील मिणचे खोऱ्यातील डोंगर माथ्यावरील शेकडो एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नियोजित बसुदेव – भुजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण कामास 1 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजुर करणेत आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
भुदरगड व राधानगरी तालुक्यातील जनतेशी गेल्या 35 ते 40 वर्षापासूनची मागणी असलेल्या बसुदेव – भुजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण कामास कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून सन 2024 ते 25 सालच्या प्रापण सुचीमधून 1 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ लवकरच करणेत येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील मुधाळ, कुर, कोनवडे, नाधवडे, मिणचे खुर्द, मिणचे बुद्रुक, बसरेवाडी, लोटेवाडी, पंडीवरे व राधानगरी तालुक्यातील सरवडे, कासारवाडा, कासारपुतळे, सावर्डे पाटण, धामणवाडी, ढेंगेवाडी, पंडेवाडी व कागल तालुक्यातील बोरवडे व उंदरवाडी आदी गावातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून दुधगंगा प्रकल्पामधून सदरील क्षेत्रास पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यामूळे दोन्ही तालुक्यातील वर्षानुवर्ष डोंगर माथ्यावर असणारे पडीक क्षेत्र ओलिताखाली येणार असून गेल्या कित्येक वर्षांची मागणी असलेल्या बसुदेव – भुजाई उपसा सिंचन योजनेच्या कामास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.