अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ; विविध बँकेकडून लाभार्थ्यांना कर्ज वितरण
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे मराठा समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देवून,त्यांना आर्थिक पाठबळ देते. कोल्हापूर जिल्हा हा सर्वाधिक लाभार्थी संख्या पूर्ण करुन राज्यात अव्वल ठरला असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यात 10 हजार 504 लाभार्थ्यांना विविध व्यवसायांसाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. लाभार्थ्यांना 888 कोटी 73 लाख 72 हजार 460 रुपयांचे कर्ज विविध बँकांकडून वितरीत झाले असून कर्जाची योग्य परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना 84 कोटी 73 लाख 44 हजार 527 रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे .
कर्जाची परतफेड योग्यरीत्या करणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांचे व्याज अगदी सुरळीत आणि वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. यासाठी कर्ज खात्याचा उतारा बँकेच्या सही शिक्यासह अपलोड करणे (क्लेम करणे) गरजेचे असते. योग्य क्लेम केल्यानंतरच लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळतो. ही कार्यवाही करुनही व्याज परतावा न आल्यास त्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिली असण्याची शक्यता असते. अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा. त्रुटींची पूर्तता केल्यास व्याज परतावा पुन्हा सुरु होतो. व्याज परताव्यासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता नसणे, क्लेम प्रलंबित असणे अथवा व्याज परतावा मिळण्यास अन्य कोणतीही अडचण आल्यास किंवा क्लेम केल्यानंतरही व्याज परतावा न मिळाल्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे भेट द्यावी. कोणत्याही व्यक्तीच्या भूल-थापांना बळी पडू नये, असे आवाहन आंग्रे यांनी केले आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ काय म्हणाले बघा.. खर्चाचे नियाेजन फेब्रुवारी अखेर करा