सहाव्या बाल चित्रपट महत्त्वाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन
कोल्हापूर : वर्गात किंवा स्पर्धेत पहिला क्रमांक काढणे हे आयुष्याचे ध्येय नाही तर तुम्हाला जे आवडते त्यात उच्च स्थानावर पोहोचणे हेच ध्येय असले पाहिजे असे प्रतिपादन ‘वारसा’ या माहितीपटाचे फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले.येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत शाहू स्मारक भवन येथे बुधवारी सहाव्या बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सूर्यवंशी यांच्या हस्ते स्टेजवरून मुलांकडे पाठ करून सेल्फी काढत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर महानरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव होते.
सूर्यवंशी म्हणाले, चिल्लर पार्टी सर्व वाड्यावस्त्यामध्ये पोहोचत आहे,या दुर्गम भागातील मुलांना जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट दाखविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रशासन अधिकारी शंकर यादव म्हणाले, कलात्मक पद्धतीचे चित्रपट दाखवून चिल्लर पार्टी मुलांना वेगळे आणि चांगले चित्रपट पाहण्याची विशेष रुची निर्माण करत आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून अभ्यास होतो. चित्रपट केवळ मनोरंजनाचे नव्हे तर ते ज्ञानाचेही साधन आहे.
उद्घटनापूर्वी बाल चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी रविंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक केले. गुलाबराव देशमुख यांनी परिचय करून दिला. मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. सलीम महालकरी यांनी आभार मानले. सिनेमांची माहिती अभय बकरे, तत्पूर्वी पाहुण्यांचे स्वागत ‘सिनेमा पोरांचा” पुस्तक देऊन करण्यात आले. यावेळी शाहू स्मारक सांस्कृतीक भवनचे व्यवस्थापक डी. एम. नांगरे, किरण पोटे, प्रशांत भिलवडे, सुधाकर सावंत,चिल्लर पार्टीचे ओंकार कांबळे, घनश्याम शिंदे, इशान आणि अर्शद महालकरी, नसीम यादव, यशोवर्धन आडनाईक उपस्थित होते.
शाळेतील मुलांचा सत्कार
पाण्यात होडी सोडणारी मुलगी या बालचित्रपट महोत्सवाचा लोगो आहे. या संकल्पनेवर आधारित टाकाऊ वस्तूंपासून होड्या तयार करणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेच्या मुलांचा आणि शिक्षकांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाला उपस्थित असणाऱ्या महानगरपालिकेतील शाळांच्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. या महोत्सवात जगभरातील बालचित्रपट चळवळीची माहिती असलेले खास प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
महापालिका शाळेतील १५०० विद्यार्थी उपस्थित
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत बुधवारी या महोत्सवात रानाज सायलेन्स, कल्टी आणि द गुड डायनासोर हे बाल चित्रपट दाखवण्यात आले. महोत्सवात कोल्हापूर महानरपालिकेच्या शाळेतील पहिल्या दिवशी १५०० विद्यार्थी उपस्थित होते. गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी या दोन दिवसीय महोत्सवाचा समारोप होणार आहे.
फोटो : कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे सहाव्या बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी बाल प्रेक्षकांचा सेल्फी घेऊन करण्यात आला. यावेळी डावीकडून सलीम महालकरी, शाहू स्मारकचे व्यवस्थापक डी. एम. डोंगरे, उदय कुलकर्णी, दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी, महापालिकेचे शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी शंकर यादव, गुलाबराव देशमुख आणि रविंद्र शिंदे उपस्थित होते.
फोटो दुसरा : कोल्हापुरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आयोजित बाल चित्रपट महोत्सवात भरवण्यात आलेल्या बाल चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.