बाळासाहेबांचे स्वप्न… अयोध्येत राममंदिर उभे राहावे आणि ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने उभे राहिले आहे…
मुंबई – उद्या 17 नोव्हेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिवस आहे. आणि त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. व त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून त्यांना आदरांजली वाहिली याप्रसंगी त्यांच्या सोबत खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार किरण पावसकर, आमदार डॉ मनीषा कायंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्या शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांचा 11 वा स्मृती दिवस आहे. स्मृतिदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझ्याकडून व आमच्या समस्त शिवसेना पक्षाकडून त्यांना नम्रपणे आदरांजली वाहत आहे. आणि त्यांना मनापासून नमन करत आहे. वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन, बाळासाहेबांना अपेक्षित असलेले काम आम्ही गेली दीड वर्षे करतोय.
बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्येत राममंदिर उभे राहावे आणि ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने उभे राहिले आहे. 23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे. आणि 22 जानेवारीलाच लोकार्पण करून आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी राम मंदिर खुले करत आहोत. तसेच नवी मुंबई मेट्रो उद्या पासून सुरू होणार आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी त्याची पाहणी केलेली आहे. त्यामुळे उद्या विना उद्घाटन आम्ही मेट्रो सुरू करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.