रसिक मंत्रमुग्ध.. स्वरसुरांनी उजळली दिपावली! राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांनी जिंकली उपस्थितांची मनं

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या सुरेल मैफिलीमुळं कोल्हापूरचे रसिक मंत्रमुग्ध, दिवाळी पाडव्याला रसिकांना मिळाली स्वरसुरांची मेजवानी

स्वरावर हुकूमत, काळजाचा ठाव घेणारे सुर यातून प्रतिभावंत गायक महेश काळे यांची सुरेल मैफिल पाडव्याच्या सायंकाळी रंगली. महेश काळे म्हणजे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील अनमोल हिरा आहे, असे प्रतिपादन धनंजय महाडिक यांनी केले. चॅनेल बी प्रस्तुत स्वर संध्या या  कार्यक्रमात ते बोलत होते. महेश काळे यांच्या जादुई सुरांनी सुमारे दोन तास रसिक अक्षरश: भारावून गेले होते. चॅनेल बी प्रस्तुत आणि भागीरथी महिला संस्था यांच्या पुढाकारातून मंगळवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात, प्रसिध्द गायक महेश काळे यांची गीत मैफिल झाली. स्वर संध्या या कार्यक्रमाला कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील निवडक आणि दर्दी श्रोत्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते आयुक्त के. मंजूलक्ष्मी, विश्वराज महाडिक यांच्या हस्ते अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचा सत्कार झाला. तर रॅगसन्स ग्रूपचे प्रतिनिधी आणि काजवे फर्निचरचे प्रतिनिधी यांचा सत्कार, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केला. हार्मोनियम वादक राजीव तांबे, तबलावादक वैभव खांडोळकर, पखवाज वादक ओंकार दळवी, व्हायोलिन वादक अपूर्व गोखले, सह गायक प्रल्हाद जाधव यांचा शौमिका महाडिक यांच्या हस्ते, तर तालवाद्य वादक अपूर्व द्रविड, गीता कुलकर्णी यांचा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते बासरी वादक हर्षिद शंकर यांचा तर वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते शर्वरी कुलकर्णी, प्रांजली कुलकर्णी यांचा सत्कार झाला.

खासदार धनंजय महाडिक यांनी, महेश काळे यांच्या गायकीबद्दल गौरवोद्गार काढून, त्यांच्याकडून अशीच गायन सेवा राहू दे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच खासदार महाडिक यांच्या हस्ते महालक्ष्मीची मूर्ती आणि शाल देऊन महेश काळे यांचा सत्कार करण्यात आला. गायक महेश काळे यांनी कोल्हापुरात कार्यक्रम करायला नेहमीच आवडतो असं सांगत, पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी महाडिक यांनी या कार्यक्रमाचं नेटक नियोजन केल्याबद्दल आभार मानले.  त्यानंतर गायक महेश काळे यांच्या मैफिलीला सुरवात झाली.

सुरवातीला राग जोग मधील दोन बंदीशी त्यांनी सादर केल्या. मोरे घर आ साजन…..ही बंदीश सादर करताना श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांची दाद दिली. त्यानंतर महेश काळे यांनी स्वतः रचलेल्या चालीचे अभंग सादर केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले….. यासह भाई चित्रपटातील ते शब्दांच्या पलीकडले…… तसंच माझे जीवन गाणे…. अशी गाणी महेश काळे यांनी सादर केली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आठवणींना उजाळा देत, महेश काळे यांनी सादर केलेल्या सुर निरागस हो…. या गाण्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कानडा राजा पंढरीचा… या गाण्यावर तर अख्खं सभागृह भक्तीरसात न्हावून निघालं. तर हे सुरांनो चंद्र व्हा… या गाण्याला रसिकांनी डोक्यावर घेतलं. सुमारे दोन तास रंगलेल्या या मैफिलीमुळं दिवाळी पाडव्याची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली आणि सुरांनी तृप्त झालेल्या कोल्हापुरकरांना एक संचित मिळाले.  

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.