मुख्य अभियंता मा. परेश भागवत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न…
कोल्हापूर : शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील पायाभूत विद्युत सुविधांचे महावितरणकडून नूतनीकरण करण्यात आले आहे. परिसरातील विद्युत जाळे भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभित व सुरक्षित होतो आहे. या नूतनीकरण कामात ३१५ केव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र स्थलांतरीत करून उभारलेल्या ११ केव्ही /४४० व्होल्ट क्षमतेच्या महालक्ष्मी विद्युत उपकेंद्राचे उदघाटन कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता मा. परेश भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी संपन्न झाले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा. सुधाकर जाधव, कोल्हापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता मा. सुनील माने, कार्यकारी अभियंता (प्रशासन) मा. अभिजित सिकनीस, कार्यकारी अभियंता (चाचणी) मा. देविदास कोरडे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. नितीन धुमाळ,मा. राहुल पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या १ कोटी ७० लक्ष निधीतून महालक्ष्मी मंदिर परिसराच्या सुशोभिकरण अंतर्गत विद्युत सुविधा नूतनीकरण व ऊपरी विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.महाद्वार रोड, जुना राजवाडा परिसर, जोतिबा रोड, दक्षिणद्वार, बिनखांबी गणेश मंदिर या भागात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करण्यात येते आहे. या भागातील १७८० ग्राहकांना भूमिगत वाहिनीतून वीज जोडणी दिली जाणार आहे. महाद्वार रोड, दक्षिण द्वार व जुना राजवाडा परिसरातील काम पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणी १७०० मीटर लघुदाब, १५० मीटर उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करण्यात आले आहे. उर्वरित ५०० मीटर लघुदाब व १४० मीटर उच्चदाब भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने सदरील कामी जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. अधीक्षक अभियंता मा. अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता मा. सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत कासार, शाखा अभियंता सुनील धुळुगडे, इंद्रजित कांबळे, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), विश्वजीत कांबळे यांच्यासह जनमित्रांनी या कामी परिश्रम घेतले. ठेकेदार मे. सुमंत यांनी हे काम केले.