|
कोल्हापूर WATCHTEAM डिसेंबर २०२९ पर्यंत ‘नशामुक्त भारत’ घडवण्याच्या संकल्पात आता करवीरनगरीही आपले पाऊल भक्कमपणे टाकणार आहे. तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि संपूर्ण जिल्हा नशामुक्त करण्यासाठी येत्या जानेवारी महिन्यात कोल्हापुरात भव्य ‘नशामुक्त कोल्हापूर दौड’चे आयोजन करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली आहे.
शाहूजी सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘NCORD’ समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राठोड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध थेट ‘ॲक्शन मोड’वर येण्याचे संकेत दिले आहेत.
प्रशासनाचा धडक प्लॅन: जनजागृतीसोबतच कडक कारवाई!
केवळ जनजागृती करून न थांबता व्यसनाची मुळे उखडून टाकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत:
-
- बंद कारखान्यांवर धाडी: एमआयडीसी (MIDC) परिसरातील बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये काही गैरप्रकार चालतात का, याचा शोध घेण्यासाठी अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
- शाळा-कॉलेजमध्ये प्रबोधन: तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे.
- गांजा तस्करांवर ‘वॉच’: राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाने एकत्रितपणे गांजा प्रकरणाचा आढावा घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार: १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या बैठकीत चालू वर्षातील (२०२६) कारवाईचा लेखाजोखा मांडत नशाखोरांना कडक इशारा दिला आहे.
-
- यंदा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात एकूण २१३ खटले दाखल करण्यात आले असून, यामध्ये २७० आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
- यापैकी १४७ गुन्हे केवळ गांजा सेवनाचे, तर ६६ गुन्हे इतर अमली पदार्थांच्या तस्करीचे आहेत.
- पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १ कोटी ११ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून, यापुढे ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

संपूर्ण यंत्रणा सज्ज!
या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्य उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक युवराज शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका दळवी, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक एम. के. कुलकर्णी, अन्न व औषध प्रशासनाचे सो. प्र. वाढे, एलसीबीचे सुशांत चव्हाण, दीपा शिपुरकर, डॉ. व्ही. एन. आरळेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
|