संत नामदेव महाराजांच्या विचारांचा राष्ट्रीय गौरव! अभिवादनाचा देशभरातून वर्षाव;
राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या कार्याला मिळतेय व्यापक यशाची पावती!
संत शिरोमणी नामदेव महाराज जयंतीनिमित्त यंदा देशभरात दिसून आलेला अभूतपूर्व उत्साह, राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांकडून व्यक्त झालेले अभिवादन आणि संत नामदेव महाराजांप्रती व्यक्त झालेली श्रद्धा पाहून मन अक्षरशः आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे.
नुकतेच नागपूरच्या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेले संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आज एका व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.
आज संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरातून त्यांना अभिवादन केले जात असताना, देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर आणि लोकप्रतिनिधींनी संत नामदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. ही केवळ एका संताच्या जयंतीची औपचारिकता नाही, तर त्यांच्या विचारांचे राष्ट्रीय पातळीवर वाढत असलेले महत्त्व आणि समाजाच्या अस्मितेला मिळणारा सन्मान याचे द्योतक आहे.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार, महाराष्ट्राचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ, श्री. चंद्रकांतदादा पाटील, श्री. पार्थ अजित पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. मोहनजी यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, नागपूरच्या महापौर सौ. नीता ठाकरे, भोपाळच्या महापौर, नागपूर दक्षिणचे आमदार श्री. मोहनजी मते, पूर्व नागपूरचे आमदार श्री. प्रवीणजी दटके, तसेच मंत्री सौ. अदितीताई तटकरे यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी संत नामदेव महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. विशेष आनंदाची बाब म्हणजे, यंदा संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त देशभरात जो उत्साह, आत्मीयता आणि अभिमानाचे वातावरण दिसून येत आहे, तो यापूर्वीच्या तुलनेत अधिक व्यापक आणि ठळकपणे जाणवतो आहे. अभिवादनाचा जणू काही वर्षावच होत आहे. ही परिस्थिती निश्चितच आशादायी आहे.
यामागे केवळ एका दिवसाचे नियोजन किंवा एखाद्या कार्यक्रमाची प्रसिद्धी नाही, तर संत नामदेव महाराजांचे विचार, त्यांचे सामाजिक योगदान, त्यांची राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण आणि त्यांच्या अनुयायी समाजाची संघटित होण्याची वाढती जाणीव आहे.
संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून भक्तीबरोबरच समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून पंजाबपर्यंत त्यांच्या विचारांचा झालेला प्रसार हा त्यांच्या व्यापक राष्ट्रीय प्रभावाचा ऐतिहासिक पुरावा आहे. त्यांच्या रचना शीख धर्माच्या पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे संत नामदेव महाराज हे केवळ एका समाजाचे किंवा एका प्रांताचे संत नसून संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अनमोल ठेवा आहेत.
विश्व संत श्री नामदेवजी महाराज यांच्या 756 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. कार्तिक शुध्द एकादशी 21 नोव्हेंबर 2026
आज त्यांच्या जयंतीला मिळणारा हा राष्ट्रीय सन्मान पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, समाज संघटित झाला, आपल्या संतांचा इतिहास आणि विचार प्रभावीपणे समाजासमोर मांडले, तर समाजाच्या अस्तित्वाला, अस्मितेला आणि योगदानाला राष्ट्रीय स्तरावर निश्चितच प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे हेच खरे फलित मानायला हरकत नाही. या महासंमेलनाच्या माध्यमातून निर्माण झालेली वैचारिक जागृती, समाजाला जोडण्याची प्रेरणा आणि राष्ट्रीय स्तरावर संत नामदेव महाराजांचे नाव व कार्य पोहोचविण्याचा झालेला प्रयत्न आता सकारात्मक परिणाम दाखवू लागला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजचा हा उत्साह म्हणजे अंतिम यश नव्हे, तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. या अभिवादनाचे रूपांतर ठोस सामाजिक कार्यात झाले पाहिजे. समाजातील सर्व शाखा, पंथ, प्रांत आणि संघटनांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एका व्यापक सामाजिक ध्येयासाठी एकत्र आले पाहिजे. शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमीकरण, युवकांचे नेतृत्व, महिलांचा सहभाग आणि संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार या क्षेत्रांत एकजुटीने काम करण्याची हीच योग्य वेळ आहे.
आज सात कोटी समाजबांधवांच्या मनात अभिमानाची भावना जागृत होत असेल, तर त्या अभिमानाला संघटनशक्तीची, कृतीची आणि सामाजिक परिवर्तनाची जोड मिळणे आवश्यक आहे.संत नामदेव महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने येणाऱ्या काळात समाजासाठी निश्चितच चांगले घडेल, असा मनापासून विश्वास वाटतो. आजचा दिवस केवळ जयंतीचा उत्सव नाही; तो आपल्या सामाजिक अस्मितेच्या जागृतीचा, राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पाचा आणि नव्या आशेचा दिवस आहे.
चला, संत नामदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन एक संकल्प करूया— संतांचा विचार घराघरांत पोहोचवूया, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणूया, संघटित समाजातून सक्षम समाज घडवूया आणि संत नामदेव महाराजांच्या समतेच्या, बंधुतेच्या व मानवतेच्या विचारांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देऊया. कारण संत नामदेव महाराजांचा गौरव ही केवळ आपल्या संतपरंपरेची प्रतिष्ठा नाही, तर संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची ओळख आहे!
संत शिरोमणी नामदेव महाराज की जय
शुभेच्छुक : ईश्वर सुशीला नामदेवराव धिरडे मुख्य संयोजक: संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता समिती( भारत)