टाळ-मृदंगाच्या गजरात खासदार महाडिकही झाले वारकरी!

टाळ हाती घेत विठुनामाचा जयघोष; खांद्यावर घेतली विठुरायाची पालखी, नंदवाळच्या पायी दिंडीत भक्तिरंग

कोल्हापूरWATCH TEAM : टाळ-मृदंगाचा निनाद, मुखी विठ्ठल नामाचा गजर, डोक्यावर तुळस आणि पावलांना फुगडीचा ठेका… अशा भक्तिमय वातावरणात कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त कोल्हापूर ते श्रीक्षेत्र नंदवाळ हा ११ किलोमीटरचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांनीही वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होत भक्तिरंगात रंग भरला. हातात टाळ घेऊन विठुनामाचा जयघोष करणाऱ्या महाडिक यांनी स्वतःच्या खांद्यावर विठुरायाची पालखी घेत वारकऱ्यांसोबत पायी वाटचाल केली.

कोल्हापुरातील साकोली कॉर्नर येथील ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यादव मठाच्या वतीने या दिंडी आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सकाळपासूनच मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. खासदार महाडिक यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते तसेच अभयसिंह घोरपडे, प्रवीण फडतरे, प्रसाद कुलकर्णी, दिलीप देसाई, खंडेराव जाधव, दत्ता पाटील आणि अशोक पाटील यांच्या उपस्थितीत पालखी पूजन झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला.

वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले खासदार महाडिक दिंडीसोबत टाळ वाजवत अभंग आणि विठुनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे दिंडी उभा मारुती चौकात पोहोचली. येथे उभा मारुती भक्त प्रसाद मंडळ आणि महालक्ष्मी शेजारती ग्रुपच्या वतीने सुमारे २०० किलो खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दिंडी खंडोबा तालमीकडे रवाना झाली. येथे पार पडलेल्या उभ्या रिंगण सोहळ्याने उपस्थित वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.

पुढे दिंडी पुई खडीच्या दिशेने मार्गस्थ झाली. हुपरी येथील नाना माळी यांच्या बैलाचा रथ हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. ठिकठिकाणी भाविकांनी दिंडीचे स्वागत केले. झिम्मा-फुगडीचा फेर, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

राजकीय व्यासपीठापलीकडे वारकरी भावनेचा अनुभव

हजारो विठ्ठलभक्तांच्या सहभागाने रंगलेल्या या सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा वारकरी वेशातील सहभाग लक्षवेधी ठरला. केवळ पालखी पूजनापुरता सहभाग न ठेवता, टाळ हातात घेऊन दिंडीत चालणे, पालखी खांद्यावर घेणे आणि वारकऱ्यांसोबत भक्तिरसात तल्लीन होणे, यातून त्यांनी सोहळ्याचा आनंद अनुभवला. भक्ती, परंपरा आणि सामूहिक श्रद्धेचा संगम घडवणारी ही कार्तिकी दिंडी कोल्हापूरकरांसाठी भक्तिमय पर्वणी ठरली.