महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांना कोल्हापुरात उत्साहात प्रारंभ
राज्यभरातील १,२४६ खेळाडूंचा सहभाग; ४०१ महिला आणि ८४५ पुरुष खेळाडू मैदानात
कोल्हापूर – TEAM WATCH
खेळ म्हणजे केवळ विजय आणि पराभव नसून शिस्त, जिद्द, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्याचे प्रभावी माध्यम आहे. क्रीडास्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासह ग्राहकसेवेसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे खेळाडूंनी विजयासाठी जिद्दीने प्रयत्न करताना खिलाडूवृत्तीही जपावी आणि स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यावा, असे प्रतिपादन महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (भा.प्र.से.) यांनी केले.
महावितरणच्या वतीने कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस ग्राऊंडवर आयोजित चार दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत राज्यभरातील महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे कार्यकारी संचालक (महसूल व चाचणी) तथा पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुनील काकडे होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे (भा.प्र.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा (भा.पो.से.), महावितरणचे कार्यकारी संचालक परेश भागवत व भुजंग खंदारे, मुख्य अभियंते ज्ञानेश कुलकर्णी, संजय पाटील, अशोक साळुंखे, दीपक पाटील, स्वप्नील काटकर, मुख्य महाव्यवस्थापक (विवले) अनिल कालेकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड उपस्थित होते.
वीजसेवेतील कर्मचारी आता क्रीडांगणावरही चमकणार!
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुनील काकडे म्हणाले की, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी राज्यभर अखंडित वीजसेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतात. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून तेच कर्मचारी आज क्रीडांगणावर आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यकारी संचालक परेश भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा आणि छत्रपती संभाजीनगरचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे यांच्या हस्ते स्पर्धेतील चषकांचे अनावरण करण्यात आले. यानंतर खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलनातून मान्यवरांना मानवंदना दिली.
१८ क्रीडा प्रकारांत रंगणार चुरस; १,२४६ खेळाडूंचा सहभाग
महावितरणच्या १६ परिमंडलांतील संयुक्त आठ संघांच्या माध्यमातून या राज्यस्तरीय स्पर्धेत सुमारे १,२४६ खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये ४०१ महिला आणि ८४५ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. एकूण १८ विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी या चार दिवसीय स्पर्धेचा समारोप होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले, तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी आभार मानले.
पहिल्याच दिवशी धावपटूंची दमदार कामगिरी; कोल्हापूरच्या खेळाडूंचीही चमक
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या १०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतींमध्ये महिला व पुरुष खेळाडूंनी वेग आणि कौशल्याची चुणूक दाखविली. विविध गटांतील विजेत्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :
१०० मीटर धावणे – महिला
१. प्रिया पाटील (सांघिक कार्यालय – भांडूप)
२. भारती राऊत (कल्याण – रत्नागिरी)
३. संजना शेजाळ (पुणे – बारामती)
१०० मीटर धावणे – पुरुष
१. गुलाबसिंग वसावे (पुणे – बारामती)
२. शुभम निंबाळकर (कोल्हापूर)
३. चंद्रशेखर हेमने (नागपूर – गोंदिया – चंद्रपूर)
४०० मीटर धावणे – महिला
१. रागिणी बेले (नागपूर – गोंदिया – चंद्रपूर)
२. भक्ती लोमटे (पुणे – बारामती)
३. स्नेहल धावरे (कोल्हापूर)
४०० मीटर धावणे – पुरुष
१. प्रतीक वाईकर (पुणे – बारामती)
२. चंद्रशेखर हेमने (नागपूर – गोंदिया – चंद्रपूर)
३. अथर्व कोळी (कोल्हापूर)
कोल्हापूरच्या शुभम निंबाळकर यांनी १०० मीटर पुरुष गटात द्वितीय, तर स्नेहल धावरे आणि अथर्व कोळी यांनी अनुक्रमे महिला व पुरुष ४०० मीटर गटात तृतीय क्रमांक मिळवून स्थानिक खेळाडूंची उपस्थितीही ठळक केली.
ही बातमीही अधिक वाचली गेली.. महावितरणदेखील आघाडीवर..‘सौर जागर’मधून परिसर प्रकाशमय





























