कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला जन्मोत्सव; देशभरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन
कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी हा दिवस भगवान सहस्त्रार्जुन महाराजांचा जन्मोत्सव म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हैहयवंशीय चंद्रवंशी राजा कार्तवीर्य अर्जुन अर्थात सहस्त्रार्जुन महाराज हे शौर्य, पराक्रम, दानशूरता, विद्वत्ता आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानले जातात.
पौराणिक कथांनुसार, सहस्त्रार्जुन महाराजांचे जन्मनाव एकवीर होते. ते राजा कृतवीर्य यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना कार्तवीर्य अर्जुन असे संबोधले जाऊ लागले. भगवान दत्तात्रेय यांची कठोर आराधना केल्यानंतर त्यांना हजार हातांचे सामर्थ्य प्राप्त झाल्याचे वरदान मिळाले. त्यामुळे ते सहस्त्रबाहू किंवा सहस्त्रार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले.
महाभारत, भागवत पुराणासह विविध पौराणिक ग्रंथांमध्ये त्यांच्या पराक्रमाचे आणि जीवनकार्याचे वर्णन आढळते. त्यांनी अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला. त्यापैकी लंकाधिपती रावणासोबतचे युद्ध विशेष प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार, नर्मदा नदीच्या तीरावर झालेल्या युद्धात सहस्त्रार्जुन महाराजांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर रावणाचा पराभव करून त्याला बंदी केले होते. पुढे महर्षी पुलस्त्य यांच्या मध्यस्थीने रावणाची मुक्तता करण्यात आली.
सहस्त्रार्जुन महाराजांचे महर्षी जमदग्नी यांच्याशीही संबंध होते. त्यांच्या जीवनातील पराक्रम, सामर्थ्य आणि दानशूरतेच्या कथा आजही समाजात श्रद्धेने सांगितल्या जातात.
भारतातील कलार, कलाल, कलवार आणि कलचुरी समाज बांधव सहस्त्रार्जुन महाराजांना आपले आराध्य दैवत व पूर्वज मानतात. त्यामुळे कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला देशभरात विविध ठिकाणी पूजा-अर्चा, दीपोत्सव, शोभायात्रा आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मध्य प्रदेशात या जन्मोत्सवाला सार्वजनिक सुट्टीही दिली जाते.
जन्मोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प!
भगवान सहस्त्रार्जुन महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून यंदा समाजबांधवांनी केवळ उत्सव साजरा न करता पर्यावरण संवर्धनाचाही संकल्प करावा. बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड यांचा विचार करता प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. वृक्षांच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण करणे हीच महाराजांच्या जन्मोत्सवाला सामाजिक बांधिलकीची सुंदर जोड ठरेल.
शौर्य, पराक्रम, दानशूरता आणि समाजहिताचा आदर्श जपणाऱ्या भगवान सहस्त्रार्जुन महाराजांना जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी नमन! समस्त कलार, कलाल, कलवार आणि कलचुरी समाजबांधवांना जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय सहस्त्रार्जुन महाराज! जय कलार!
लेखक : रमेश कृष्णराव लांजेवार

























