दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगवर येणार नवा लाेगाे…
बाजारात मिळणारे दूध, दही, पनीर, लोणी आणि तूप यांसारखी अस्सल दुग्धजन्य उत्पादने ओळखणे आता ग्राहकांसाठी अधिक सोपे होणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) सर्व दुग्धजन्य आणि कंपोझिट मिल्क उत्पादनांच्या पॅकेजिंगवर एकसमान ओळखचिन्ह (लोगो) लावणे अनिवार्य केले आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या आकर्षक पॅकेजिंगमुळे अनेकदा शुद्ध दुग्धजन्य पदार्थ आणि इतर पर्यायी उत्पादने यांतील फरक ग्राहकांच्या लगेच लक्षात येत नाही. ही फसवणूक टाळण्यासाठी आणि सर्व ब्रँड्सच्या लेबलिंगमध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.हा नवीन लोगो निळ्या रंगाच्या चौकोनी बॉक्समध्ये (Blue Square) पांढऱ्या रंगाच्या थेंबाच्या (White Droplet) आकारात असेल. खरेदी करताना ग्राहकांना दुरूनही हे चिन्ह स्पष्ट दिसावे, यासाठी पॅकेटच्या पुढील भागाच्या क्षेत्रफळानुसार या निळ्या चौकोनाचा किमान आकार ६ मिमी ते १६ मिमी दरम्यान ठेवणे बंधनकारक आहे. पॅकेटच्या आकारानुसार आतील पांढऱ्या थेंबाची उंची आणि रुंदीही निश्चित करण्यात आली आहे.FSSAI ने ९ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत राजपत्राद्वारे या सुधारित नियमांची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये मसुदा प्रस्ताव जाहीर करून उत्पादक आणि ग्राहकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, ज्यावर सखोल विचार करून हा अंतिम निर्णय घेण्यात आला. कंपन्यांना पॅकेजिंगमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी १ जुलै २०२८ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दुधापासून बनवलेले शुद्ध पदार्थ एका नजरेत ओळखता येतील आणि पॅकेटवरील माहिती समजून घेणेही अधिक सोपे होईल.

























